१० वर्षांनी मालिकेत कमबॅक, पण २ महिन्यांतच शिल्पा शिंदेची 'भाभीजी घर पर है' होतेय बंद, नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:24 IST2026-04-01T16:24:03+5:302026-04-01T16:24:26+5:30
अवघ्या दोन महिन्यांतच 'भाभीजी घर पर है 2.0' मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. &Tv वर या मालिकेचं प्रसारण होतं. मात्र चॅनेलच्या काही बदलेल्या नियमांमुळे ही मालिका बंद होत आहे. ५ एप्रिलला या मालिकेचा शेवटचा भाग शूट केला जाणार आहे.

१० वर्षांनी मालिकेत कमबॅक, पण २ महिन्यांतच शिल्पा शिंदेची 'भाभीजी घर पर है' होतेय बंद, नेमकं कारण काय?
'भाभीजी घर पर है' ही हिंदी टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय मालिका. या मालिकेचा दुसरा सीझन म्हणजेच 'भाभीजी घर पर है 2.0' काही महिन्यांपूर्वीच सुरू झाला होता. या मालिकेतून शिल्पा शिंदे तब्बल १० वर्षांनी अंगुरी भाभी बनून पुन्हा मालिकेत परतली होती. मात्र आता अवघ्या दोन महिन्यांतच 'भाभीजी घर पर है 2.0' मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. &Tv वर या मालिकेचं प्रसारण होतं. मात्र चॅनेलच्या काही बदलेल्या नियमांमुळे ही मालिका बंद होत आहे. ५ एप्रिलला या मालिकेचा शेवटचा भाग शूट केला जाणार आहे.
&Tv ने नवीन मालिकांची कंटेट निर्मिती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मे २०२६ पासून &Tv हे चॅनल एका 'सशुल्क पुनर्प्रसारण वाहिनी'मध्ये (paid re-run channel) रुपातंरित होणार आहे. या चॅनेलचा कारभारही नव्या टीमकडे सोपवला जाणार आहे. त्यामुळे नवीन मालिकांच्या कंटेट निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार नसून जुन्याच मालिकांचे पुन:प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे नव्यानेच सुरू झालेली 'भाभीजी घर पर है 2.0' ही मालिकाही बंद केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेचा शेवटचा भाग १६ एप्रिल २०२६ रोजी प्रसारित केला जाणार आहे.
'भाभीजी घर पर है' मालिका २०१५ मध्ये सुरू झाली होती. या मालिकेत सुरुवातीला शिल्पा शिंदे अंगुरी भाभीच्या भूमिकेत होती. मात्र वर्षभरातच तिने मालिका सोडली होती. त्यानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रे इतकी वर्ष अंगुरी भाभीची भूमिका साकारत होती. तब्बल ११ वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काही महिन्यांपूर्वीच 'भाभीजी घर पर है'मध्ये शिल्पा शिंदेने पुन्हा एन्ट्री घेतली होती. मात्र आता ही मालिका बंद होते आहे.