या रिअॅलिटी शोच्या मचांवर एकत्र आल्या सावनी आणि बेला शेंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 15:48 IST2019-10-12T15:15:17+5:302019-10-12T15:48:12+5:30
परीक्षक वैभव मांगले आणि सावनी शेंडे यांच्यासमोर, स्पर्धक आपले उत्तम परफॉर्मन्सेस देत असतात.

या रिअॅलिटी शोच्या मचांवर एकत्र आल्या सावनी आणि बेला शेंडे
झी युवा' वाहिनीवरील 'युवा सिंगर एक नंबर' ही गाण्याची स्पर्धा अधिकाधिक कठीण होत चालली आहे. अल्पावधीतच सर्व स्पर्धकांनी आपली छाप पाडलेली आहे. परीक्षक वैभव मांगले आणि सावनी शेंडे यांच्यासमोर, स्पर्धक आपले उत्तम परफॉर्मन्सेस देत असतात. या आठवड्यात स्पर्धकांसमोर असलेले आव्हान अधिक मोठे होते. मराठी कलाक्षेत्रातील दोन दर्जेदार आणि सर्वांचे लाडके गायक, स्वप्निल बांदोडकर आणि बेला शेंडे हेदेखील मंचावर उपस्थित होते. मृण्मयी देशपांडे हिने या दोघांचेही 'युवा सिंगर'च्या कुटुंबात स्वागत केले. या दिग्गजांसमोर आपली गाणी सादर करणे, हे स्पर्धकांसाठी मोठे आव्हान ठरले होते. काही स्पर्धकांनी त्यांचीच गाणी सादर करण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांच्या उपस्थितीमुळे 'युवा सिंगर'च्या या आठवड्याची रंगत अधिक वाढली.
२४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असलेल्या 'ट्रिपलसीट' या सिनेमातील एक उत्कृष्ट गीत स्वप्निल आणि बेलाने या मंचावर सादर केले. त्यांच्या उत्तम परफॉर्मन्सने या भागाची सुरुवात झाली. या दोघांसमोर आपली गाणी सादर करण्यासाठी, अनेक स्पर्धकांनी खूप मेहनत घेतली होती. परीक्षकांकडून ब्लास्ट मिळवत या स्पर्धकांनी ते दाखवून दिले आहे. वैष्णवीने बेलाचे, 'राती अर्ध्या राती' हे प्रसिद्ध गाणे तिच्यासमोर सादर केले. स्वतः बेलाने सुद्धा या सादरीकरणाबद्दल तिचे कौतुक केले. अर्थातच, सगळ्यांच्या आग्रहाखातर बेलाने सुद्धा या गाण्याची एक छोटीशी झलक प्रेक्षकांसाठी सादर केली.
तिच्याकडून गाणे ऐकताना मंचावरील सर्वच जण मंत्रमुग्ध झाले होते. विशाल सिंग यानेही स्वप्निल बांदोडकरचे 'राधे कृष्ण नाम' हे गीत सादर करण्याचे आव्हान स्वीकारले. त्याला मात्र उत्तम सादरीकरणातून स्वप्निलवर आपली छाप पाडता आली नाही. एकूणच स्वप्निल आणि बेलाची मंचावरील हजेरी या 'एक नंबर' कार्यक्रमाची शान आणखी वाढवणारी ठरली.