सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये विठू नामाचा गजर,भक्तीरसात रसिकही होणार मंत्रमुग्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 12:24 IST2021-07-13T12:17:22+5:302021-07-13T12:24:21+5:30
आषाढी एकादशीच्या निमित्ताने या आठवड्यात सर्व लिटिल चॅम्प्स विठुरायाच्या महिमा आपल्या गाण्यातून सादर करणार आहेत.

सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये विठू नामाचा गजर,भक्तीरसात रसिकही होणार मंत्रमुग्ध
सावळ्या विठूरायाच्या चरणी प्रत्येकजण लीन होतो... लहानापांसून थोरांपर्यंत प्रत्येकाला पांडुरंगाचे वेड...विठ्ठलाच्या अभंग आणि भक्तीगीतांमध्ये रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी छोटे लिटिल चॅम्प्स विठ्ठलभक्ती, अभंग-भक्तीगीतांचा सूरमयी नजराणा सादर करणार आहेत.पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत.
आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हटले की, प्रथम डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनामुळे अनेक प्रतिबंध लावण्यात आले, त्यामुळे गेल्यावर्षी आणि ह्यावर्षी देखील महाराष्ट्राला वारी अनुभवता आली नाही पण यावर्षी झी मराठीवरील 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधील १४ टॅलेंटेड लिटिल चॅम्प्स त्यांच्या सुमधुर गाण्यांनी आपल्याला विठूमाऊलीच दर्शन घडवतील. या विशेष भागाची सुरुवात प्रथमेश लघाटेच्या सुंदर अभंगाने होईल. इतकंच नव्हे तर या अभंगावर सर्व लिटिल चॅम्प्सची पंढरीची वारी प्रेक्षक बघू शकतील.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने या आठवड्यात सर्व लिटिल चॅम्प्स विठुरायाच्या महिमा आपल्या गाण्यातून सादर करणार आहेत. या आठवड्यात हे स्पर्धक अभंग, ओव्या आणि भारूड गाऊन परीक्षक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. आता या स्पर्धेत लिटिल चॅम्प्सना गोल्डन तिकीट मिळायला सुरुवात झाली असून अनेक लिटिल चॅम्प्सनी १ नव्हे तर दोन्ही आठवड्यात गोल्डन तिकिट्स मिळवली आहेत. या आठवड्यात गोल्डन तिकीट आणि 'परफॉर्मर ऑफ द वीक'चं टायटल कोण पटकवणार हे पाहण औस्त्युक्याच ठरेल.