'ही' अभिनेत्री करतेय साखरपुडा; पार्टीत भेटले, प्रेम जडलं; फक्त ७ महिन्यांच्या ओळखीनंतर घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:45 IST2026-01-23T18:39:41+5:302026-01-23T18:45:24+5:30
लोकप्रिय अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

'ही' अभिनेत्री करतेय साखरपुडा; पार्टीत भेटले, प्रेम जडलं; फक्त ७ महिन्यांच्या ओळखीनंतर घेतला निर्णय
'अनुपमा' मालिकेत राहीची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अद्रिजा रॉय सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अवघ्या २६ व्या वर्षी अद्रिजाने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या २५ जानेवारीला ती साखरपुडा करणार आहे. तिचा होणारा पती विघ्नेश अय्यर हा तमिळ कुटुंबातील आहे.
अद्रिजाने 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आणि विघ्नेशच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं. तिने सांगितले की, "आमची पहिली भेट गेल्या वर्षी मे महिन्यात एका मित्राच्या पार्टीत झाली होती. पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकांकडे आकर्षित झालो. त्यानंतर इन्स्टाग्रामवर आमचं बोलणं सुरू झालं आणि मग आम्ही एकमेकांना भेटू लागलो. आता आम्ही आमच्या नात्याला एक पाऊल पुढे घेऊन जात आहोत".
विघ्नेशबद्दल बोलताना अद्रिजा म्हणाली, "मला नेहमीच असा जोडीदार हवा होता, जो अभिनय क्षेत्रातील नसेल. विघ्नेश तसाच आहे आणि तो खूप साधा आहे. आम्ही दोघेही साध्या राहणीमानावर विश्वास ठेवतो".
लग्नासाठी दोन वर्षांची वाट पाहावी लागणार
साखरपुडा जरी आता होत असला, तरी लग्नासाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल अद्रिजा म्हणाली, "या वर्षी आम्ही लग्न करणार नाही. विघ्नेश तमिळ आहे आणि मी बंगाली आहे. आमच्या दोन्ही संस्कृती वेगळ्या आहेत. मला दोन्ही रीतिरिवाजांनुसार मोठ्या थाटात लग्न करायचे आहे, त्यासाठी नियोजनाला वेळ हवा आहे. त्यामुळे आम्ही पुढील दोन वर्षांत लग्न करण्याचा विचार करत आहोत".
साखरपुड्यासाठी अद्रिजाने तीन दिवसांची सुट्टी घेतली आहे. तिने सुट्टीवर जाण्यापूर्वीच तिचे सर्व सीन्स शूट करून दिले आहेत. जेणेकरून 'अनुपमा' मालिकेचे काम थांबणार नाही. विशेष म्हणजे, तिने या सोहळ्यासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमला आमंत्रित केले आहे. दरम्यान, अद्रिजाने यापूर्वी 'इमली', 'कुंडली भाग्य', 'दुर्गा और चारू' आणि 'बॉयफ्रेंड अँड गर्लफ्रेंड्स' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तिच्यावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.