'पवित्र रिश्ता'मधली माझी पहिली मैत्रीण..., प्रियाच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:47 IST2025-09-01T13:46:51+5:302025-09-01T13:47:25+5:30

'पवित्र रिश्ता' मध्ये अंकिताची बहीण होती प्रिया मराठे

ankita lokhande shared emotional post remembering late marathi actress and pavitra rishta co star priya marathe | 'पवित्र रिश्ता'मधली माझी पहिली मैत्रीण..., प्रियाच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावुक

'पवित्र रिश्ता'मधली माझी पहिली मैत्रीण..., प्रियाच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावुक

अभिनेत्री प्रिया मराठेचं (Priya Marathe) काल ३१ ऑगस्ट रोजी पहाटे निधन झालं. प्रियाला कॅन्सर झाला होता. तिच्या अशा अचानक जाण्याने प्रत्येकालाच धक्का बसला आहे. काही वर्षांपूर्वीच प्रियाला कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावर तिने मातही केली होती. मात्र पुन्हा तिचा आजार उफाळून आला. दोन-तीन महिन्यांपासून तिची प्रकृती आणखी खालावली. तिने कोणालाही भेटायला नकार दिला. यामुळे प्रियाची तब्येत नक्की कशी आहे हे कोणालाच समजू शकलं नाही. प्रिया मराठे म्हटलं की 'पवित्र रिश्ता' मालिका आठवते. अंकिता लोखंडे, प्रार्थना बेहेरे आणि प्रिया अशा तिघील मराठमोळ्या अभिनेत्री या मालिकेत बहिणी होत्या. प्रियाच्या निधनानंतर प्रार्थना तिच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचली होती. तर आज अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी केली आहे.

अंकिता लोखंडेने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, "प्रिया माझी पवित्र रिश्ता मधली पहिली मैत्रीण होती. मी, प्रार्थना आणि प्रिया...आमची छोटी गँग होती. आम्ही सोबत असलो की खूप धमाल यायची. आम्ही तिघी एकमेकींना प्रेमाने 'वेडे' असं मराठीत म्हणायचो. आमचं नातं खरंच खूप खास होतं.  प्रिया माझ्या चांगल्या दिवसांमध्ये माझ्यासोबत होती आणि वाईट काळात मला धरुन होती. मला तिची गरज असेल तेव्हा ती कायम हजर असायची. दरवर्षी ती माझ्याकडे गौरी गणपतीचं दर्शन घ्यायला आली. यावर्षी मी तुझ्या आत्म्याला शांती मिळो म्हणून प्रार्थना करेन. माझी वेडे...तुझी खूप आठवण येत आहे. "

ती पुढे लिहिते, "प्रिया खूपच स्ट्राँग होती. ती प्रत्येक लढाईला मोठ्या धैर्याने सामोरी गेली. आज ती आमच्यासोबत नाही आणि हे लिहिताना मी मनातून खचत आहे. तिच्या जाण्याने आज एक गोष्ट जाणवली की एखादी व्यक्ती हसत असली तरी ती कोणत्या प्रसंगाला सामोरी जात असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. त्यामुळे कायम प्रेमाने वागा. प्रिया माझी प्रिय वेडे, तू कायम आमच्या मनात आणि स्मरणात राहशील.  जोवर आपण भेटत नाही तोवर...प्रत्येक आनंदासाठी, अश्रूसाठी आणि प्रत्येक क्षणासाठी तुझे आभार. ओम शांती."


याच मालिकेत प्रियाच्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता अनुराग शर्मानेही तिला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने मालिकेतील फोटो शेअर करत लिहिले, "मला विश्वासत बसत नाहीये. एक सुंदर व्यक्ती, हुशार कलाकार आणि चांगली मैत्रीण आज मी गमावली आहे. प्रियासोबतच्या हजारो आठवणी आहेत ज्या आता डोळ्यासमोर येत आहेत. माझे हात थरथरत आहेत. प्रियासोबत काम केलेला प्रत्येक क्षण मी नेहमी साजरा करेन. प्रिया मराठेसोबत काम करणं माझं सौभाग्यच होतं. ती अतिशय निरागस, प्रेमळ होती. तिचं हसू मी कधीच विसरु शकणार नाही. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो मेरी दोस्त. ओम शांती."


Web Title: ankita lokhande shared emotional post remembering late marathi actress and pavitra rishta co star priya marathe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.