'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत रंजक वळण, वल्लरी पिंगा गर्ल्सच्या मदतीने घेणार मिनाक्षीचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:39 IST2025-12-11T17:39:23+5:302025-12-11T17:39:53+5:30
Pinga Ga Pori Pinga Serial : 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे.

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत रंजक वळण, वल्लरी पिंगा गर्ल्सच्या मदतीने घेणार मिनाक्षीचा शोध
कलर्स मराठीवरील 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. मालिकेत बुलबुल बागेत सध्या प्रचंड हलकल्लोळ माजला आहे. वल्लरीची चाहती म्हणून बेळगावहून मुंबईत आलेली मीनाक्षी अचानक रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली आहे. घरच्यांना न सांगता परीक्षा देण्यासाठी मुंबईत आलेली ही साधी, निरागस मुलगी अचानक गायब झाल्याने बुलबुल बागेतील सगळ्यांची झोप उडाली आहे.
मीनाक्षीच्या गायब होण्याची माहिती मिळताच वल्लरी सगळ्या पिंगा गर्ल्सना एकत्र करून शोधमोहीमेवर निघते. परिसरातील गल्लीबोळ, मैदान, लोकल स्टेशनपासून ते मीनाक्षी शेवटची दिसली त्या भागापर्यंत सगळीकडे तगडी चौकशी सुरू होते. मुली भेदरलेल्या असल्या तरी एकमेकींचा हात घट्ट धरून मीनाक्षीला शोधून काढण्याचा निर्धार करतात. मीनाक्षी कुठे आहे? तिच्या गायब होण्यामागे नक्की कोणाचा हात आहे का? वल्लरी पिंगा गर्ल्सच्या साथीने मीनाक्षीला कशी शोधून काढणार? या प्रश्नांची उत्तरं मिळणार आणि बुलबुल बागेत एक धक्कादायक सत्य उलगडणार आहे.
शोधमोहीम जसजशी खोलात जाते तसतसे काही धक्कादायक संकेत समोर येऊ लागतात. मीनाक्षीचं अपहरण केलं गेल्याची शक्यता बळावते. त्यातच बुलबुल बागेत अलीकडेच दाखल झालेली मंजुषा जी एका प्रतिष्ठित आश्रमाशी जोडलेली आहे तिच्यावर आता संशयाची सुई वळू लागली आहे. अचानक बेपत्ता झालेल्या मीनाक्षीच्या शोधासाठी बुलबुल बागेतली प्रत्येक मुलगी रात्रंदिवस धडपड करत आहे. रहस्य अधिक गडद होत चाललं असून या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा सुगावा मिळत असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. पिंगा गं पोरी पिंगा मालिकेचा महारविवार विशेष भाग १४ डिसेंबर संध्या ७ वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळेल.