इशित भट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अतिआत्मविश्वासामुळे तुम्हाला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 10:10 IST2025-10-17T10:06:06+5:302025-10-17T10:10:48+5:30
१० वर्षांचा इशित भट अमिताभ यांच्याशी उद्धटपणे वागला त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीका झाली. यानंतर अमिताभ यांनी नुकत्याच एका एपिसोडमध्ये केलेलं वक्तव्य चर्चेत आहे

इशित भट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अतिआत्मविश्वासामुळे तुम्हाला..."
'कौन बनेगा करोडपती १७ जूनियर्स' मधील १० वर्षांचा स्पर्धक इशित भटच्या उद्धट स्वभावामुळे सध्या सोशल मीडियावर या शोची जोरदार चर्चा सुरू आहे. इशित अतिआत्मविश्वासामुळे काहीही रक्कम न जिंकता खेळातून बाद झालाच शिवाय त्याने बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनामुळे प्रेक्षकांकडून त्याच्यावर खूप टीका झाली. अशातच नुकतंच बिग बींनी या प्रकरणावर मौन सोडलंय.
अमिताभ यांची प्रतिक्रिया चर्चेत
इशित भटच्या प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांनी अतिआत्मविश्वास तुमचं कसं नुकसान करु शकतो, यावर टिप्पणी केली आहे. त्यांनी थेट इशित भटचं नाव घेतलं नसलं तरी, त्यांनी दिलेली प्रतिक्रिया इशितच्या स्वभावाशी जोडली गेली आहे. अमिताभ बच्चन म्हणाले, "तुम्ही सर्वांनी लहानपणी सापशिडीचा खेळ खेळला असेल. जेव्हा तुम्ही जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचता, तेव्हा अचानक एक मोठा साप येतो आणि तुमचा खेळ पूर्णपणे बदलतो. तुम्हाला तो एकदम खाली ओढतो. वास्तविक जीवनातही असंच घडतं.''
''खऱ्या आयुष्यातील हा साप आहे अतिआत्मविश्वास. प्रत्येक खेळ काही मूलभूत तत्त्वांवर आधारित असतो. विजय, पराजय, एकाग्रता, आत्मविश्वास... पण अतिआत्मविश्वास तुम्हाला एकाच झटक्यात खाली खेचू शकतो."
अमिताभ शेवटी म्हणाले, "कासवाचा विजय होणं अशक्य होतं, परंतु सशाच्या अतिआत्मविश्वासामुळे तो जिंकलेली बाजी हरला. त्यामुळे, तुम्ही जे धोके स्वीकारता, त्याबद्दल नेहमी सावध राहा आणि एक समाधानी खेळाडू म्हणून पूर्ण आत्मविश्वासाने खेळ खेळा." 'केबीसी १७ जूनियर्स'च्या एपिसोडमध्ये महाराष्ट्राची स्पर्धक स्पृहा तुषार शिंखेडे हॉटसीटवर बसली होती. तिने २५ लाख रुपये जिंकले होते. पुढे खेळ सुरू करण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी तिला हा सल्ला दिला. त्यामुळे बिग बींनी इशित भटचं नाव घेतलं नसलं तरीही त्यांनी तिला हा सल्ला दिला.
इशित भट्टचा नेमका वाद काय होता?
गांधीनगर, गुजरातचा रहिवासी असलेल्या १० वर्षांच्या इशित भटने हॉटसीटवर आल्यावर अमिताभ बच्चन यांना मध्येच टोकलं आणि नियमांबद्दल जास्त बोलू नका, मला सर्व माहितीये, असं सांगितलं. याशिवाय अमिताभ जेव्हा प्रश्न विचारायचे, तेव्हा इशित पर्याय न ऐकता लगेच उत्तर द्यायचा आणि 'लॉक करा' असं सांगायचा. 'रामायणा'शी संबंधित एका सोप्या प्रश्नाचे उत्तर त्याने पर्यायांचा विचार न करता अतिआत्मविश्वासात चुकीचं दिलं आणि तो मोठी रक्कम गमवून बसला. त्याच्या अतिआत्मविश्वासासोबतच अमिताभ बच्चन यांच्याशी केलेल्या वर्तनामुळे सोशल मीडियावर इशित टीकेचा धनी झाला आहे.