'जय जय स्वामी समर्थ' मालिका सोडल्यानंतर अक्षय मुदवाडकरने शेअर केला Video, चाहतेही भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 10:16 IST2026-03-24T09:58:32+5:302026-03-24T10:16:05+5:30
स्वामी समर्थांच्या भूमिकेत आता नवा चेहरा!

'जय जय स्वामी समर्थ' मालिका सोडल्यानंतर अक्षय मुदवाडकरने शेअर केला Video, चाहतेही भावुक
कलर्स मराठी वरील 'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या बाहेरून देखील रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे. या मालिकेत 'स्वामी समर्थ' यांची भूमिका अभिनेता अक्षय मुडावदकरने साकारली. त्याच्या प्रभावी संवादफेकीमुळे आणि सादरीकरणामुळे ही मालिका घराघरांत पोहोचली. पण, आता अलिकडेच त्यानं या मालिकेचा निरोप घेतला आहे. मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर अक्षय मुदवाडकरने चाहत्यांचे आणि निर्मात्यांचे आभार मानले आहेत.
अक्षय मुदवाडकरने सोशल मीडियावर एक विशेष व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात तो म्हणाला, "नमस्कार...गेली पाच वर्ष आणि १७५० हून अधिक भाग मला स्वामींची भूमिका साकारायची संधी मिळाली. त्यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो. हा स्वामींचा आशीर्वाद आहे, असं मी मानतो. त्याचबरोबर तुम्हा रसिक प्रेक्षकांनी पाच वर्ष मला भरभरून प्रेम दिलं. त्यासाठी मी तुमचा कायम ऋणी असेल. ज्या पद्धतीने एखादा प्रवास सुरुवात होतो, तो कुठेतरी थांबणार हे निश्चित असतं. त्यामुळे माझ्या स्वामींच्या भूमिकेचा प्रवास इथपर्यंतच होता. हा प्रवास जरी इथे थांबत असला तरी ही भूमिका आणि हा प्रवास कायम माझ्यासोबत राहणार आहे".
पुढे तो म्हणाला, "भविष्यातही मी विविध भूमिका केल्या तरी स्वामींची भूमिका ही माझ्यासाठी अग्रस्थानी असेल. मी तुम्हाला रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. कलर्स मराठी आणि निर्मात्यांचे आभार मानतो. कारण, त्यांनी संधी दिली. त्यामुळे मला ही भूमिका साकारता आली. यापुढे आपली भेट मालिकेत होणार नसली तरी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय आहे. आपण तिथे भेटूया... सर्वांचे मनापासून आभार... जय स्वामी समर्थ", अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. अक्षयच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. "आमच्यासाठी तुम्हीच साक्षात स्वामी होता" अशा शब्दांत प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.
स्वामी समर्थांच्या भूमिकेत आता नवा चेहरा!
अक्षय मुदवाडकरने मालिका सोडली. कारण मालिकेत आता स्वामी समर्थांच्या महानिर्वाण अध्यायाला (जीवनाचा उत्तरार्ध) सुरुवात झाली आहे, ज्यात अधिक परिपक्व आणि वयस्कर रूपाची गरज होती. अक्षय मुदवाडकरच्या जागी आता प्रसिद्ध मराठी अभिनेते सुनील गोडसे स्वामी समर्थांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले आहेत. स्वामी समर्थांच्या प्रकटदिनाचे औचित्य साधून मालिकेत हा मोठा बदल करण्यात आला आहे. सुनील गोडसे यांची स्वामींच्या भूमिकेतील एन्ट्री असलेला विशेष भाग नुकताच प्रसारित झाला. सुनील गोडसे हे मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील अनुभवी नाव आहेत. ते या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक भूमिकेला कसा न्याय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.