"बाप म्हणून उभं राहिले, आई-आप्पानंतर त्यांनीच" अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाणचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 10:17 IST2026-01-29T10:15:29+5:302026-01-29T10:17:05+5:30
अजित पवार यांच्या निधनानंतर सूरज चव्हाणने भावूक व्हिडीओ शेअर केला आहे. रडत रडत म्हणाला, "माझ्यासाठी त्यांनी काय केलंय ते माझ्या मनाला माहिती आहे..."

"बाप म्हणून उभं राहिले, आई-आप्पानंतर त्यांनीच" अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाणचा टाहो
Ajit Pawar Death : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात बारामती येथे निधन झालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या बारामती येथे सभा होणार होत्या, त्यासाठी अजित पवार मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. या विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मराठी कलाकारांनी अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 'बिग बॉस' विजेता सूरज चव्हाणदेखील अजित पवार यांच्या जाण्यानं पूर्णपणे कोलमडून गेला आहे.
सूरजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे. सूरजला आपले अश्रू आवरता येत नव्हते. तो म्हणाला, "आज माझ्यावर दु:खाचा डोंगर पसरलाय. कारण, आज माझा दिवस खूप घाण गेलाय. पहिल्यांदाच मी बातमी बघितली बारामतीचे आपले दादा, माझ्या वडिलांसारखे होतेच. त्यांनी मला एवढं मोठं घर दिलं. घर नव्हतं खोपटं होतं. पण आधार म्हणून, बाप म्हणून उभं राहिले. माझ्यासाठी त्यांनी काय केलंय ते माझ्या मनाला माहिती आहे".
सूरज पुढे म्हणतो, "ते गरिबांसाठी आधार होते, त्यांच्यासाठी ते उभे राहत होते. अजित दादांना मी आयुष्यभर विसरणार नाही. माझ्यासाठी काय केलंय ते मला माहितीये. एवढं मोठं साम्राज्य उभं करून गेले, दु:ख देऊन गेले. डोळ्यांतून इतके अश्रू येतायत, मन भरून आलंय, आता काय सांगू", या शब्दात सूरजने भावना व्यक्त केल्या.
सूरजने या व्हिडीओसोबत एक भावूक कॅप्शन लिहिलं. त्याने लिहलं की, "मित्रांनो माझा देव चोरला... आज मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत. माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं… माझी काळजी घेतली... मला नवीन आयुष्य मिळवून दिलं. अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही… याचं मला खूप वाईट वाटतंय... खूप दुःख होतंय… माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन. दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली... तुमचाच सूरज".
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांनी स्वतः सूरजची भेट घेऊन त्याचे कौतुक केले होते. तसेच त्याला घर बांधून देण्याचा शब्द दिला आणि तो पुर्णही केला. अजित पवारांनी सूरजला आलिशान घर दिलं आणि स्वतःच घराच्या चाव्या त्याच्या हातात दिल्या. विशेष म्हणजे घराचं बांधकाम सुरु असताना त्यांनी स्वत: पाहणी केली होती.