मोठ्या स्कॅममधून थोडक्यात वाचल्या ऐश्वर्या नारकर, गॅस कंपनीच्या नावाने आला होता फ्रॉड कॉल; नेमकं काय घडलं?
By कोमल खांबे | Updated: February 26, 2026 16:14 IST2026-02-26T16:14:07+5:302026-02-26T16:14:53+5:30
चिन्मय मांडलेकरच्या पत्नीनंतर ऐश्वर्या नारकर यांच्यासोबतही हा फ्रॉड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऐश्वर्या नारकर यांनी व्हिडीओ शेअर करत हा धक्कादायक प्रकार सांगितला आहे. चाहत्यांना त्यांनी काळजी घेण्याचं आणि अशा कॉलपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

मोठ्या स्कॅममधून थोडक्यात वाचल्या ऐश्वर्या नारकर, गॅस कंपनीच्या नावाने आला होता फ्रॉड कॉल; नेमकं काय घडलं?
ऑनलाइन फ्रॉड आणि स्कॅमचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. बँकिंग फ्रॉड आणि डिजिटल अरेस्टनंतर आता महानगर गॅसच्या नावे नवा फ्रॉड सुरू झाला आहे. मराठी कलाविश्वातील काही सेलिब्रिटींना या फ्रॉडमध्ये फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चिन्मय मांडलेकरच्या पत्नीनंतर ऐश्वर्या नारकर यांच्यासोबतही हा फ्रॉड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऐश्वर्या नारकर यांनी व्हिडीओ शेअर करत हा धक्कादायक प्रकार सांगितला आहे. चाहत्यांना त्यांनी काळजी घेण्याचं आणि अशा कॉलपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, "एका स्कॅममधून देवाच्या कृपेने वाचली आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करतेय. ४-५ दिवसांपूर्वी मला व्हॉट्सअॅपवर महानगर गॅसकडून मेसेज आला होता. तुमच्या कनेक्शनचा प्रॉब्लेम झालाय तर तुमचा गॅस आज संध्याकाळी बंद केला जाईल. मला एक विचार आला की बिलची हार्ड कॉपी आली की मी लगेच भरुन टाकते त्यामुळे बिल पेंडिंग असण्याचा काही संबंधच नाही. मी त्यांना मेसेज केली की मला बिल मिळालेलच नाही. तर त्यांचा मला व्हॉट्स अॅप कॉल आला. त्यांचा लोगो वगैरे असल्याने ते ऑथेंटिक वाटत होतं".
त्यापुढे म्हणाल्या, "मी त्यांना सांगितलं की तुमची हार्ड कॉपी आलेली नाही. मी आत्तापर्यंतची तुमची सगळी बिलं भरली आहेत. तर तुम्ही माझं कनेक्शन कसं काय बंद करू शकता? तर त्यांचा माणूस म्हणाला की बिल भरण्यासाठी हे नाही. तर आम्ही सॉफ्टवेअर अपडेट करतोय. आणि त्या सॉफ्टकॉपी येण्यासाठी तुमचं अपग्रेडेशन झालेलं नाहीये. आणि त्यासाठी तुमचं कनेक्शन बंद केलं जाईल. मी त्यांना म्हटलं की हा मुद्दा मला कळत नाहीये. तर त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही. मी तुम्हाला एक लिंक पाठवतो. त्यावर तुम्ही क्लिक केलं की तुमचं अपग्रेडेशन होईल आणि कनेक्शन बंद होणार नाही. हा फ्रॉड कॉल आहे, हे मला समजतच नव्हतं. त्यांनी जी फाइल पाठवली ती apk फाइल होती. apk फाइल या स्कॅमच्या फाइल असतात हे मी ऐकलं होतं. त्याने मला सांगितलं की यावर क्लिक करून मी सांगतो तसे डिटेल्स भरा. पण माझा आयफोन असल्याने त्या फाइलवर क्लिकच होत नव्हतं".
"मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला वेबसाइट सांगा. तिथे काय करायचंय ते आम्ही करतो. तर त्याने मला विचारलं की तुमचा कुठला फोन आहे. मी त्याला सांगितलं की आयफोन आहे. मग त्याने मला सांगितलं की अँड्रॉइड फोनमधून ओपन करा. मग मला शंका आली. मी त्याला म्हटलं की जे काही करायचंय ते मी ऑफिशियल वेबसाइटवर करेन. असं म्हटल्यावर त्याने कॉल कट केला. मला एवढंच सांगायचं आहे की असा कुठला बँकिंग किंवा इतर कुठलाही फोन आला तर त्याला प्रतिसाद देऊ नका. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लगेचच कोणतीही अॅक्शन करू नका. थोडा विचार करा. हे सगळे मोठे स्कॅम सुरू आहेत. यातून तुम्ही नक्कीच वाचू शकता. प्रत्येकवेळी थोडा विचार करा", असं म्हणत त्यांनी घडलेला प्रकार सांगितला आहे.