अभिनेत्री अदिती द्रविडचा पार पडला साखरपुडा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेअर केले फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 18:36 IST2025-03-30T18:36:07+5:302025-03-30T18:36:28+5:30
अभिनेत्रीनं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

अभिनेत्री अदिती द्रविडचा पार पडला साखरपुडा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेअर केले फोटो!
मराठी मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड चर्चेत आहे. अभिनेत्रीनं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. नुकताच अदिती द्रविडचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. अदितीने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
अदितीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत तिनं कॅप्शनमध्ये 'अदिती झाली मोहित' हा सुंदर हॅशटॅग दिला आहे. या फोटोत दोघेही फारच आनंदी दिसत आहेत. साखरपुड्यासाठी अदितीने लेहेंगा परिधान केला होता. तर तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. साखरपुड्याच्या फोटोंवर चाहत्यांसह सध्या संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
याशिवाय, अदितीने होणाऱ्या नवऱ्यासह पारंपरिक लूकमध्येही सुंदर असं फोटोशूट केलं आहे. या लूकसाठी तिनं साडी नेसली होती. लाल रंगाची साडी आणि त्यावर पारंपरिक दागिने असा लूक तिनं केला होता. अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव मोहित लिमये असं आहे. त्यांच्या लग्नाबद्दल आता चाहत्यांच्याही मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
अदितीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. तर 'बाईपण भारी देवा' या सिनेमातील मंगळागौर गाण्यामुळे अदिती प्रसिद्धीझोतात आली होती. सिनेमातील 'मंगळागौर' गाणं अदितीने स्वत: लिहिलं होतं. हे गाणं लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रने गायलं आहे.तिने लिहिलेल्या या गाण्याला लोकप्रियता मिळाली. राहुल द्रविड अदितीचा चुलत काका आहे. खुद्द अभिनेत्रीनेच एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना याचा खुलासा केला होता.