अभिनेत्री सुहास जोशींचे छोट्या पडद्यावर पुनरागमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 12:34 IST2018-07-20T12:31:39+5:302018-07-20T12:34:16+5:30
'ललित २०५' मालिकेत सुहास जोशी प्रमुख भूमिकेत

अभिनेत्री सुहास जोशींचे छोट्या पडद्यावर पुनरागमन
अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांतून आपल्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर 'ललित २०५' ही नवीन मालिका लवकरच दाखल होत आहे. या नव्या मालिकेत त्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
स्टार प्रवाहची प्रत्येक मालिका काही ना काही वेगळेपण घेऊन येते. 'ललित २०५' ही मालिका एकत्रित कुटुंबावर आधारित आहे. सध्याच्या काळात असे एकत्र कुटुंब अभावानेच पाहायला मिळते. आजीचा सहवास तर विरळ होत चालला आहे. 'ललित २०५' मधून नात्यांमधला हरवलेला संवाद नव्याने शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सुहास जोशी या मालिकेत आजीच्या भूमिकेत दिसतील. या मालिकेतील इतर कलाकारांबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
या मालिकेबद्दल सुहास जोशी यांनी सांगितले की, ''अग्निहोत्र' या मालिकेनंतर मी बऱ्याच वर्षांनी स्टार प्रवाहची मालिका करते आहे. त्यामुळे मी खूप खूश आहे. ही एक कौटुंबिक मालिका आहे. या मालिकेत मी आजीच्या भूमिकेत दिसणार आहे आणि ही आजी तुम्हाला तुमच्या आजीची आठवण नक्कीच करून देईल. '
'ललित 205' ही मालिका 6 ऑगस्टपासून रात्री साडेआठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.