अभिनेत्री श्वेता मेहंदळेने आईसोबत बनवले डबल डेकर मोदक, चाहत्यांनी रेसिपी बघून केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 15:37 IST2025-08-27T15:36:50+5:302025-08-27T15:37:29+5:30
मराठमोळी अभिनेत्री श्वेता मेहंदळेने बनवलेले डबल डेकर मोदक सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा व्हिडीओ

अभिनेत्री श्वेता मेहंदळेने आईसोबत बनवले डबल डेकर मोदक, चाहत्यांनी रेसिपी बघून केलं कौतुक
सर्वत्र गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पासाठी सर्वजण गोडाधोडाचा नेवैद्या करताना दिसत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री श्वेता मेहंदळेने गणेशोत्सवानिमित्त खास ‘डबल डेकर मोदक’ तयार केला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. श्वेता मेहंदळेने व्हिडीओ शेअर करुन डबल डेकर मोदकाची रेसिपी सर्वांसोबत शेअर केली आहे.
श्वेताच्या डबल डेकर मोदकाची चर्चा
श्वेताने सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करुन सर्वांना ही अनोखी रेसिपी सांगितली आहे. श्वेताची आई सुद्धा या व्हिडीओत दिसतेय. या मोदकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, आपण सर्व जसं बाप्पासाठी पाकळ्यांचा मोदक बनवतो तसा बनवायचा. त्यानंतर तो बंद करताना वरती पीठ जास्त ठेवायचं. ते पीठ फुलवून त्याच्याही पाकळ्या करुन घ्यायच्या. त्यानंतर वरच्या पाकळीत थोडं सारण भरुन ती पाकळी बंद करायची. अशाप्रकारे डबल डेकर मोदक तयार होतो. श्वेताने ही रेसिपी बनवून सर्वांनाच चकीत करुन सोडलं आहे.
श्वेताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या खास डबल डेकर मोदकाचा व्हिडीओ शेअर केला आहा. ‘माझे यंदाचे डबल डेकर मोदक’ असे कॅप्शन तिने दिले आहे. तिच्या या कल्पकतेचं चाहते खूप कौतुक करत आहेत. श्वेताच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत तिचे अभिनंदन केले आहे. ‘हे खूपच सुंदर दिसत आहेत’, ‘बाप्पाला नक्कीच आवडतील’ अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान, श्वेताने बनवलेला हा मोदक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. श्वेता नुकतीच आपल्याला 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत अभिनय करताना दिसली.