पतीच्या आठवणीत मराठी अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली, "थिएटरमध्ये त्याच्यासाठी एक सीट..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 18:57 IST2026-02-23T18:56:50+5:302026-02-23T18:57:48+5:30
गेले तीन चार वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते...

पतीच्या आठवणीत मराठी अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली, "थिएटरमध्ये त्याच्यासाठी एक सीट..."
छोट्या पडद्यावर 'अंगूरी भाभी' बनून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या शुभांगी अत्रेचे वैयक्तिक आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले राहिले आहे. पतीपासून वेगळे होणे, सिंगल मदर म्हणून जबाबदाऱ्या पेलणे आणि त्यानंतर पतीच्या निधनाचे दुःख सोसूनही तिने प्रेक्षकांचे मनोरंजन करणे थांबवले नाही. 'भाभीजी घर पर है' या मालिकेशी १० वर्षे जोडल्या गेलेल्या शुभांगीच्या जागी आता शिल्पा शिंदेची पुनरागमन झाले असले, तरी शुभांगीला त्याबद्दल कोणतीही खंत नाही. सध्या ती याच मालिकेवर आधारित 'भाभीजी घर पर है: फन ऑन द रन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल बोलताना शुभांगी भावूक झाली. ती म्हणाली की, "गेले तीन चार वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते. मी माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल कधीच बोलत नाही. माझे फारसे मित्रमंडळीही नाहीत. माझ्यासाठी माझं घर आणि काम एवढंच महत्वाचं आहे. पण पतीपासून वेगळी झाले तो काळ मी विसरु शकत नाही. गेल्या वर्षी पीयूषचं निधन झालं तेव्हा मी कोसळले होते. पण मला विश्वास आहे की पीयूषचा आशीर्वाद माझ्यावर आणि आमच्या लेकीवर कायम आहे. मला पीयूषच्या चांगल्या आठवणी जपून ठेवायच्या आहेत. आता मी भोपाळला घरी जाईन तेव्हा आईवडिलांसोबत सिनेमा पाहणार आहे. तिथे मी पीयूषसाठीही एक सीट ठेवेन. कारण अभिनेत्रीच्या होण्याच्या माझ्या प्रवासात पीयूषने मला खूप पाठिंबा दिला. शुभांगीने आपल्या पतीच्या आठवणींना उजाळा देताना एक खास संकल्पही व्यक्त केला. ती म्हणाली, "पीयूषने मला अभिनेत्री बनण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळे माझ्या बाजूला त्याची एक सीट मी नक्की ठेवेन हे मी स्वत:लाच दिलेलं वचन आहे."
शुभांगीची मुलगी आता २० वर्षांची आहे. लेकीबद्दल बोलताना ती म्हणाली, "तरुणपणीच आई झाल्याचे अनेक फायदे असतात हे आज जाणवतं. आधी मला असं वाटायचं की मी खूपच लवकर आई झाले. पण मी मदरहूड खूप एन्जॉय करते. काम करताना मला अनेकदा दुखापत होते, तेव्हा माझी लेक मला म्हणते आई तू स्वत:च अजून लहान आहेस. आता नुकतंच आशी अमेरिकेला शिकायला जात होती तेव्हा तिला मात्र माझीच काळजी वाटत होती. मी माझी काळजी घेईल ना याचीच तिला चिंता होती. मी जरा सोशल व्हायला हवं याचे ती मला टिप्स देत असते. खरं सांगू मुली या वरदान असतात."