अभिनेता स्वराज नागरगोजे पहिल्यांदाच अॅक्शन हिरोच्या भूमिकेत, 'तारिणी' मालिकेबद्दल म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:38 IST2025-08-05T17:38:33+5:302025-08-05T17:38:51+5:30
'तारिणी' (Tarini Serial) मालिकेत अभिनेता स्वराज नागरगोजे (Swaraj Nagargoje) पहिल्यांदा अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता स्वराज नागरगोजे पहिल्यांदाच अॅक्शन हिरोच्या भूमिकेत, 'तारिणी' मालिकेबद्दल म्हणाला...
'तारिणी' (Tarini Serial) मालिकेत अभिनेता स्वराज नागरगोजे (Swaraj Nagargoje) पहिल्यांदा अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. तो मालिकेत केदारची भूमिका साकारत आहे जो एक अंडरकव्हर कॉप आहे. त्याला समाजामध्ये जी गुन्हेगारी वाढत आहे, ती कमी करायची आहे आणि आपल्या बाबांना शोधायचं आहे. स्वराजने पहिल्या प्रोमोशूट पासून ते शूटिंगपर्यंतचे किस्से शेअर केले.
स्वराज नागरगोजे म्हणाला की, "मी आयुष्यात पहिल्यांदा अॅक्शन सीन केला आहे आणि पहिल्यांदाच गन फायर केली आहे. मला माहिती नव्हतं की गन फायर करताना इतका मोठ्या प्रमाणात आवाज होतो, मी आणि शिवानीने जशी गन फायर केली तसे आम्ही दोघेही १०-१५ सेकंदासाठी सुन्न झालो. आम्हाला कळलंच नाही कानठळ्या बसल्या आणि आम्ही दोघेपण हसायला लागलो. तो पहिला प्रोमो शूट करण्याचा अनुभव आणि त्यात पहिल्यांदा अॅक्शन आणि गन फायर करणं एकूण एक खूप छान अनुभव होता."
स्वराज पुढे म्हणाला की, "तारिणी मालिकेचे जे कास्टिंग डायरेक्टर विश्वास नवरे त्यांचा मला ऑडिशनसाठी कॉल आला होता. पण एका दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळे मला ऑडिशनला जाणं शक्य नव्हतं आणि ते मिस झालं असं जवळपास दोनदा झालं. पण मग मी त्यांना विनंती केली की घरून बनवून ऑडिशन पाठवली तर चालेल का. मला जशी ब्रिफींग मिळाली होती त्यावरुन मला जाणवलं की अंडरकॉप एजेंटची भूमिका आहे, तर पर्सनॅलिटी खूप मॅटर करते तेव्हा मी माझ्या फिटनेसकडे लक्ष दिले. जेव्हा सिलेक्शनचा कॉल आला तेव्हा माझी लूक टेस्ट सुरु होती आणि मला परत ऑडिशन द्यायची होती. लूक टेस्टनंतर ऑडिशनसाठी तयारी करत होतो. तेवढ्यात झी मराठीमधून शर्मिष्ठा मॅमना कॉल आला आणि त्यांनी सांगितले की स्वराज लॉक झालाय. मला कळलंच नाही की मी काय रिअॅक्ट करू. सगळ्यात आधी आई बाबाना सांगितलं. त्यांना खूप आनंद झाला आणि माझी खूप जवळची मैत्रीण आहे, तिला ही कॉल करून सांगितलं. मला इथे सांगावंसं वाटत माझे बाबा माझ्यासाठी खूप लकी आहेत ते आधीच बोलले होते की तुझंच सिलेक्शन होणार. तू काळजी करू नकोस आणि तसंच झालं."