"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
By देवेंद्र जाधव | Updated: October 1, 2025 09:30 IST2025-10-01T09:24:26+5:302025-10-01T09:30:02+5:30
पत्नी प्रिया मराठेच्या निधनाला एक महिना उलटताच शंतनूने लिहिली भावुक पोस्ट. मनातील भावना शेअर केल्या.

"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन होऊन आता एक महिना झाला आहे. इतक्या दिवसात अभिनेता शंतनू मोघेने प्रियाबद्दल मनातील भावना शेअर केल्या नव्हत्या. याशिवाय काही पोस्टही लिहिली नव्हती. परंतु नुकतीच शंतनूने सोशल मीडियावर प्रियासोबतचे फोटो पोस्ट लिहून मनातील भावना शेअर केल्या आहेत. याशिवाय या काळात त्याच्या पाठिशी उभं राहून त्याला साथ देणाऱ्या सर्वांचे त्याने आभार मानले आहेत.
शंतनूने प्रियासोबतचे फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, ''आज एक महिना पूर्ण झाला. वैयक्तिक दुःख आणि वेदना शब्दांत मांडणं शक्य नाही. माझ्या माहितीत असलेल्या इतक्या प्रेमळ, सकारात्मक आणि शुद्ध आत्म्याचा अनपेक्षित, अन्यायकारक आणि दुर्दैवी निरोप झाल्यामुळे आमचं हृदय आजही तुटत आहे. पण तिने असंख्य हृदयांना स्पर्श केला आणि तोही कसा... कामातून, कलेतून, प्रेमातून, काळजीने, दयाळूपणाने, वागणुकीतून, संवेदनशीलतेतून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सगळ्यांना जोडणाऱ्या तिच्या "कृती आणि सकारात्मक ऊर्जेने!''
''प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात आमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या तुम्हा सर्व लोकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. तुम्हा सर्वांसाठी प्रेम आणि शुभेच्छा! मनापासून कृतज्ञता. देवांना माझी चेतावनी: यापुढे तिची काळजी घेण्यात आणि तिच्यावर प्रेम करण्यात तुमच्याकडून एकही चूक झाली, तर ती माफ केली जाणार नाही... माझी परी (Angel)... पुन्हा भेटेपर्यंत खूप प्रेम.''
पुढे सर्वांचे आभार मानताना शंतनू लिहितो, ''ही कृतज्ञता व्यक्त करणारी एक अतिशय खास पोस्ट आहे. ज्यांनी ज्यांनी विविध संपर्क माध्यमांचा, जसं की कॉल, ई-मेल, व्हॉट्सअॅप, X (ट्विटर), इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर माध्यमातून, न्युमेरो उनो (खास व्यक्ती) अर्थात प्रिया मराठेबद्दल आपलं प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त केले, त्या सर्वांसाठी हे विशेष आभार! मी त्या सर्व कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींचा, चाहते आणि फॉलोअर्सचा, ओळखीच्या आणि अनोळखी व्यक्तींचा खूप आभारी आहे, ज्यांनी इतक्या उदारपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या.''
''तुमचा ओलावा आणि प्रामाणिकपणा, दुःख आणि काळजी आमच्यापर्यंत कोणतीही शंका न ठेवता, १००% पोहोचली. तसेच, जगभरातून आलेल्या असंख्य आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझा माणुसकीवरील विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला. देव तुमचे भले करो.''