९ वर्षांनंतर या अभिनेत्याचं अभिनयात कमबॅक, दिसणार 'शुभ श्रावणी' मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:45 IST2025-12-10T16:44:57+5:302025-12-10T16:45:47+5:30
Shubh Shravani Serial : 'शुभ श्रावणी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता अभिनय क्षेत्रात तब्बल ९ वर्षांनंतर कमबॅक करणार आहे.

९ वर्षांनंतर या अभिनेत्याचं अभिनयात कमबॅक, दिसणार 'शुभ श्रावणी' मालिकेत
कुटुंबातील नात्यांची उब, मनातील न सांगितलेलं दुख: आणि हळुवार फुलत जाणारी प्रेमकथेचा संगम 'शुभ श्रावणी' मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता अभिनय क्षेत्रात तब्बल ९ वर्षांनंतर कमबॅक करणार आहे. हा अभिनेता म्हणजे लोकेश गुप्ते. गेल्या काही वर्षांपासून त्याने दिग्दर्शन आणि लेखनावर लक्ष केंद्रीत केले होते. पण आता लवकरच तो 'शुभ श्रावणी' मालिकेत काम करताना दिसेल.
'शुभ श्रावणी' मालिकेची कथा शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्के यांची मुलगी श्रावणी राजेशिर्केभोवती फिरते. चैतन्यमय, आनंदी आणि सगळ्यांना हसवत ठेवणारी श्रावणी आपल्या मनातील दुःख मात्र कुणासमोर व्यक्त करत नाही. भूतकाळातील काही कटू घटनांमुळे वडील विश्वंभर तिच्यापासून दुरावले आहेत, इतके की तिच्या सावलीलाही ते जवळ येऊ देत नाहीत. वडिलांनी एकदाच का होईना, प्रेमाने जवळ घ्यावं ही श्रावणीची आयुष्यभराची अपूर्ण इच्छा आहे. याच भावनिक संघर्षाचा साक्षीदार आहे शुभंकर शेलार, विश्वंभर यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी. सावलीसारखा श्रावणीच्या सोबत राहणारा शुभंकर तिच्या वेदना, तिचं एकटेपण, तिचं न सांगितलेलं दुःख जवळून पाहतो. सगळं समजून घेणारा, शांत, समंजस आणि प्रगल्भ शुभंकर तिच्या आयुष्यात अनाहूतपणे एक आधार बनत जातो. या मालिकेत वल्लरी विराज, सुमित पाटील प्रमुख भूमिकेत असणार आहेत. याशिवाय अभिनेता-दिग्दर्शक लोकेश गुप्ते तब्बल ९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.
या पुनरागमनाबद्दल बोलताना लोकेश गुप्ते म्हणाला की, “मी ९ वर्षांनंतर अभिनय करणार आहे. या ९ वर्षांत मी प्रामुख्याने दिग्दर्शन आणि लेखनावर लक्ष केंद्रित केल होत. त्यामुळे तब्बल ९ वर्षांनी पुन्हा अभिनयाच्या कॅनव्हासला स्पर्श करताना वेगळीच ऊर्जा जाणवतय. अभिनयातून ब्रेक घेण्यापूर्वी मी झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका केली होती. आणि खरं सांगायचं तर, माझ्या बहुतेक मालिका मी झी मराठी सोबतच केल्या आहेत. आता या ब्रेकनंतर पुन्हा एका झी मराठीच्या एका नवीन शोमधून कमबॅक करत आहे, आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे.”