"भूषण सध्या काय करतो मला माहीत नाही..."; अभिनेता आशिष पवारचा खुलासा, काय म्हणाला?
By देवेंद्र जाधव | Updated: November 13, 2025 13:55 IST2025-11-13T13:55:02+5:302025-11-13T13:55:29+5:30
कॉमेडी एक्सप्रेस फेम आशिष पवारने त्याचा सहकलाकार आणि अभिनेता भूषण कडूबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

"भूषण सध्या काय करतो मला माहीत नाही..."; अभिनेता आशिष पवारचा खुलासा, काय म्हणाला?
भूषण कडू आणि आशिष पवार यांचं नाव घेतलं की आजही शाळेतले मास्तर आणि त्याचे विद्यार्थी आठवतात. 'कॉमेडी एक्सप्रेस'मध्ये भूषण आणि आशिषने अनेक स्कीटमध्ये एकत्र काम केलं. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. अशातच गेल्या काही वर्षांपासून भूषण कडू मनोरंजन विश्वात तितकासा सक्रीय नाही. त्याच्या पत्नीचंही निधन झालं. त्यामुळे भूषण सध्या काय करतो? त्याच्याशी संपर्क आहे का? असा प्रश्न विचारला असता आशिष पवार काय म्हणाला, जाणून घ्या
भूषण कडूबद्दल काय म्हणाला आशिष?
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत आशिष पवारने खुलासा केला की, ''फक्त भूषणबरोबरच नाही तर कॉमेडी एक्सप्रेसच्या सर्व कलाकारांसोबत अजूनही मैत्री तशीच आहे. माझे कॅरेक्टर्स लोकप्रिय होण्यात सर्व सहकलाकारांचा हात आहे. इतकी वर्ष काम करत असल्याने मैत्री होणं साहजिक आहे. पण कॉमेडी एक्सप्रेसनंतर सर्वजण आपापल्या कामामध्ये असतात. भूषण सुद्धा त्याच्या कामात होता. पण दरम्यानच्या काळात बऱ्याचशा अशा गोष्टी झाल्या त्यामुळे त्याच्याशी संपर्क असा राहिला नाही.''
''आतासुद्धा तू विचारशील तर मला खरंच माहिती नाही, की भूषण काय करतो, सध्या कुठे राहतो? खरंच मला माहित नाही. दोन-तीन वेळेला त्याचा फोन येऊन गेला. आम्ही बोललो पण तो त्याच्या कामात व्यस्त आहे. माझं हे चालू आहे, ते चालू आहे, असं म्हणाला. मी म्हटलं ओके, काहीतरी चालू आहे ना, हे महत्वाचं. रोज बोलतोय आम्ही, रोज भेटतोय असं नाहीये.''. अशाप्रकारे भूषण सध्या कुठे आहे? काय करतो? याविषयी आशिषला माहिती नाही.
भूषणला किडनॅप करण्यात आलं होतं
काही दिवसांपूर्वी 'अल्ट्रा झकास'ला दिलेल्या मुलाखतीत भूषण कडू म्हणालेला की, "तीन दिवस मला पुण्यात किडनॅप करुन ठेवण्यात आलं होतं. ज्या माणसाने सुपारी घेतली होती त्याने एकाला सांगितलं होतं की याला मध्ये मध्ये मारत राहा. पण त्याने मला मारलं नाही. तो हाताने खोटंच आवाज काढायचा आणि समोरच्याला सांगायचा की मी त्याला मारतोय. कारण तो माणूस मला भूषण कडू म्हणून ओळखत होता. तो म्हणाला, 'मी तुम्हाला मारु शकत नाही. तुम्ही कलाकार आहात. मी तुमचं काम बघतो. माझी मुलंही तुमची चाहती आहेत. म्हणून मी वाचलो."
भूषणच्या पत्नीचंही निधन झालं
भूषणची पत्नी कादंबरी कडूचं २९ मे २०२१ रोजी कोरोनाने निधन झालं. तिचं वय फक्त ३९ वर्ष होतं. पत्नीच्या निधनाने भूषणला मोठा आघात झाला. त्यांना प्राकिर्थ हा लहान मुलगा आहे. हसत्या खेळत्या सुखी कुटुंबाचं मायेचं छत्रच हरपलं. भूषण त्यानंतर प्रसिद्धीझोतापासून गायबच झाला. मधल्या काळात तो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये काही भागांमध्ये दिसला होता.