हिंदीमधील अरुंधतीच्या वाढदिवसाला अनिरुद्धची पत्नीसह हजेरी, म्हणाले- "रुपाली गांगुलीची आई मला बघताच क्षणी म्हणाल्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 12:23 IST2025-05-01T12:22:49+5:302025-05-01T12:23:19+5:30
'आई कुठे काय करते'प्रमाणेच 'अनुपमा' मालिकाही प्रचंड गाजली. अजूनही ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली हिने अनुपमाची भूमिका साकारली. नुकतंच रुपालीचा वाढदिवस साजरा झाला. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला मिलिंद गवळींनीही हजेरी लावली होती.

हिंदीमधील अरुंधतीच्या वाढदिवसाला अनिरुद्धची पत्नीसह हजेरी, म्हणाले- "रुपाली गांगुलीची आई मला बघताच क्षणी म्हणाल्या..."
'आई कुठे काय करते' ही मराठी टेलिव्हिजनवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारून मिलिंद गवळींनी प्रेक्षकांची मनं जिंकली. 'आई कुठे काय करते'चा हिंदीतही अनुपमा या नावाने रिमेक बनवण्यात आला. 'आई कुठे काय करते'प्रमाणेच 'अनुपमा' मालिकाही प्रचंड गाजली. अजूनही ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली हिने अनुपमाची भूमिका साकारली. नुकतंच रुपालीचा वाढदिवस साजरा झाला. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला मिलिंद गवळींनीही हजेरी लावली होती.
रुपाली गांगुलीच्या बर्थडे पार्टीतील फोटो मिलिंद गवळींनी शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी पोस्ट लिहिली आहे.
काल अभिनेत्री रूपाली गांगुली यांचा वाढदिवस होता. मला रूपाली यांचं आमंत्रण आल्यावर खूप आनंद झाला, मी आणि दिपाने जायचं ठरवलं. माझ्यासाठी रूपाली गांगुली सारखे खूपच कमी कलाकार आहेत, जे उत्तम अभिनय जाणतात आणि तो अभिनय करण्यासाठी खूपच प्रामाणिक काम करतात. ते काम उत्कृष्ट होण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत घेत असतात.
खरं तर आम्ही एकत्र कधीच काम केलं नाही आहे. पण कोविडच्या काळात लॉकडाऊनमुळे आम्हाला सगळ्यांना सिलवासा इथे शूटिंगला जावं लागलं होतं. त्यावेळेला 'अनुपमा' मालिकेचं आणि 'आई कुठे काय करते' मालिकेचे शूटिंग अगदी बाजूबाजूला होतं. कारण दोन्ही मालिकेचे निर्माते राजनजी शाहीच होते. त्यावेळेला जवळजवळ 50 दिवस येता जाता एकमेकांच्या सेटवर आम्ही डोकावत असू आणि एकमेकांचं काम बघत असू. कामाची पद्धत समजून घेत असू. तिथे रूपाली गांगुलीचं काम बघून मी खरंच खूप भारावून गेलो होतो.
Daily soap करणं कलाकारांसाठी सोपं नसतं. त्यात जर ती हिंदी मालिका असेल तर त्या मालिकेतल्या मुख्य कलाकारावर खूप प्रेशर आणि जबाबदारी असते. ती जबाबदारी रूपाली गांगुली उत्तम पद्धतीने पार पाडत होत्या आणि आजही पार पाडत आहेत.
दिवसभर उत्तम performance करून थकून जायचं पण संध्याकाळी जेवायला आम्ही सगळे कलाकार एकत्र त्या रिसॉर्टच्या messमध्ये भेटायचो. तेव्हा त्यांचा चेहरा हसमुख असायचा. लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांच्या लेकापासून लांब राहावं लागत होतं. त्याच्या आठवणीने त्या दुःखी व्हायच्या, पण त्याचा त्यांच्या कामावर कधीही परिणाम झाला नाही.
आज खरंच इतक्या प्रोफेशनल पद्धतीने त्या काम करतात म्हणून कदाचित 'अनुपमा' ही मालिका सहा वर्षांनंतरही उत्तम सुरू आहे आणि आजही लोकप्रिय आहे. काल त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना भेटून आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटून मला व दिपाला खूप आनंद झाला. रूपालीजींची आई मला बघताच क्षणी म्हणाल्या "अरे वा अनिरुद्ध तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि "लग्नानंतर होईलच प्रेम" ह्या मालिकेतसुद्धा मी तुमचं काम बघितलं आहे, खूप छान काम करता तुम्ही". काल रूपाली गांगुली यांच्या वाढदिवसाच्या काही सुखद आठवणी घेऊन घरी आलो. रूपालीजींच्या आयुष्यात यशस्वी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
दरम्यान, 'आई कुठे काय करते'नंतर मिलिंद गवळी हे स्टार प्रवाहवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत दिसले होते. केदार शिंदेंच्या 'झापुक झुपूक' सिनेमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमात ते खलनायकाच्या भूमिकेत आहेत.