"मला स्वयंपाक करता येत नाही, म्हणून.." मधुराणी प्रभुलकरचं स्पष्ट मत, म्हणाली- "इतरांनी हिणवलं.."
By देवेंद्र जाधव | Updated: June 8, 2025 15:35 IST2025-06-08T15:34:16+5:302025-06-08T15:35:44+5:30
मधुराणी प्रभुलकरने तिला स्वयंपाकाची आवड नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. प्रत्येक महिलेने जरुर वाचा

"मला स्वयंपाक करता येत नाही, म्हणून.." मधुराणी प्रभुलकरचं स्पष्ट मत, म्हणाली- "इतरांनी हिणवलं.."
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (madhurani prabhulkar) ही मनोरंजन विश्वातील सर्वांची लाडकी अभिनेत्री. मधुराणीला आपण विविध माध्यमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. मधुराणी प्रभुलकर जितकी उत्कृष्ट अभिनेत्री आहे तितकी ती संवेदनशील व्यक्ती आहे. मधुराणीला सामाजिक भान असून महिलांच्या विविध प्रश्नांवर ती बोट ठेवत असते. अशातच मधुराणी प्रभुलकरने तिला स्वयंपाक करता येत नाही म्हणून हिणवलं गेलं, याचा खुलासा करत तिचं स्पष्ट मत व्यक्त केलंय.
मधुराणी प्रभुलकरने आरपार या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याविषयी मत व्यक्त केलं. मधुराणी म्हणाली, "मला स्वयंपाक करता येत नाही. बेसिक करता येतो पण आवड नाहीये. म्हणजे ते काहीतरी भिजवत ठेवा, ते काहीतरी उकळवत ठेवा. मग त्याच्यातनं ते घाला मग २० मिनिटं थांबा असं काहीतरी खूप कॉम्प्लिकेटेड असतं, त्याची मला भीती वाटते. मला ते नाही जमत. मला आपलं बेसिक वरण-भात, भाजी, आमटी रोजचं जेवण जमतं."
"तर या गोष्टीचं मला इतकं वर्ष इतकं गिल्ट होतं ना की, मला असं वाटायचं की, मला जर स्वयंपाकाची आवड नाहीय तर स्त्री म्हणून कुठेतरी कमी पडतेय. आजूबाजूच्या परिस्थितीने पण मला हिणवलंच होतं त्या गोष्टीसाठी. आता मी थोडंसं कुठेतरी म्हणते की, हो मला नाहीये आवड. मी स्वतःला थोडंसं मायेने घ्यायला शिकले. नाही मला आवड. इट्स ओके! हात-पाय हलवून मी चार लोकांना जेवायला घालू शकते पण आवडीने आता हे करुन बघूया, ते करुन बघूया, तुम्ही या. एवढी मी नाहीये. तो झोन नाहीये माझा. स्त्रीला कायम तिच्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टींसाठी तिला जज केलं जातं."