"पांडुरंगाच्या चरणी मागणं हेच की..." आदेश बांदेकर भावूक, म्हणाले "हाती घेतलेलं कार्य सुफळ होवो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:33 IST2025-06-13T12:32:34+5:302025-06-13T12:33:57+5:30

अभिनेते आदेश बांदेकर 'माऊली महाराष्ट्राची' या नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Aadesh Bandekar Entry On Star Pravah By New Show Mauli Maharashtrachi | "पांडुरंगाच्या चरणी मागणं हेच की..." आदेश बांदेकर भावूक, म्हणाले "हाती घेतलेलं कार्य सुफळ होवो"

"पांडुरंगाच्या चरणी मागणं हेच की..." आदेश बांदेकर भावूक, म्हणाले "हाती घेतलेलं कार्य सुफळ होवो"

Aadesh Bandekar New Show On Star Pravah: पंढरीची वारी दरवर्षी न चुकता करावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. काहीजण संसाराच्या व्यापातून वेळ काढत ते जमवून आणतात. काहींना मात्र ते शक्य होत नाही. ज्यांना वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही. त्यांच्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन येतेय वारी विशेष कार्यक्रम 'माऊली महाराष्ट्राची'. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आदेश बांदेकरांसोबत ही पंढरीची वारी अनुभवता येणार आहे.

माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमाचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, "विठु माऊलीची वारी स्टार प्रवाहच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवता येईल हे पुण्याचं काम आणि अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आदेश बांदेकरांसोबत अख्खा महाराष्ट्र दुमदुमून जाईल यात शंका नाही. स्टार प्रवाह वाहिनीकडून सर्व रसिकांना आणि भक्तांना हे मनापासून अर्पण करतोय".

या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना आदेश बांदेकर म्हणाले, "भेटीलागी जीवा लागलीसे आस अशीच काहीशी माझी भावना आहे. याआधी वारीत सहभागी झालोय पण पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर अशी संपूर्ण वारी करण्याचा योग स्टार प्रवाह वाहिनीमुळे जुळून आला आहे. लक्ष्य मालिकेमुळे निर्माता होण्याची संधी स्टार प्रवाह वाहिनीने दिली आणि आता या नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारीची अनुभूती घरबसल्या प्रेक्षकांना देण्याची जबाबदारीही सोपवली आहे. संतांची शिकवण, वारकऱ्यांचे अनुभव, भक्तीचं रूप, आणि संपूर्ण महाराष्ट्रात होणारा भक्तीमय उत्सव माऊली महाराष्ट्राची या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हाती घेतलेलं हे कार्य सुफळ संपूर्ण व्हावं हेच पांडुरंगाच्या चरणी मागणं आहे" अशी भावना आदेश बांदेकर यांनी व्यक्त केली.

 
माऊली महाराष्ट्राची हा कार्यक्रम महाराष्ट्रातील महान धार्मिकसंस्कृतीचा, संतपरंपरेचा, विशेषतः पंढरपूर वारीचा, भावनिक आणि सांस्कृतिक प्रवास उलगडत जाईल. प्रत्येक भागात वारीचा एक एक पैलू समोर येईल. वारकऱ्यांच्या दिंड्या, पायी चालण्यामागचं भक्तीचं तत्त्वज्ञान, महिला वारकरींची भूमिका, विध्यार्थी आणि तरुणांचा सहभाग, पालखीचा बैलरथ, भक्तीचं रिंगण, माऊलीचा अश्व, पर्यावरणपूरक वारी, सुश्रुषावारी, अन्नपूर्णा वारी, कर्तव्यवारी, सेवावारी, वारीतले पुंडलिक, वारीतले लक्ष्मी-नारायण, बंधूभेट हा संपूर्ण अनुभव माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडत जाईल. आदेश बांदेकरांसोबत आणि स्टार प्रवाह वाहिनीच्या माध्यमातून घरी बसलेल्या प्रत्येकाला आपण वारीत आहोत, वारीत चालण्याचा अनुभव घेत आहोत, आपल्या घरीच पंढरीची वारी आली आहे याची अनुभूती नक्की येईल. तेव्हा पाहायला विसरु नका माऊली महाराष्ट्राची २३ जूनपासून सायंकाळी सहा वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Web Title: Aadesh Bandekar Entry On Star Pravah By New Show Mauli Maharashtrachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.