"पूजा तयार राहा...", सासू होणार सुचित्रा बांदेकर, लेकाच्या लग्नाची हातावर काढली मेहेंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:52 IST2025-12-01T13:51:43+5:302025-12-01T13:52:44+5:30
सोहमच्या घरीही मेहेंदीचा खास कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सुचित्रा बांदेकर यांनी लेकाच्या लग्नाची हातावर मेहेंदी काढली.

"पूजा तयार राहा...", सासू होणार सुचित्रा बांदेकर, लेकाच्या लग्नाची हातावर काढली मेहेंदी
सध्या मराठी कलाविश्वात सनई चौघडे वाजत आहेत. एका मागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. तर काही कलाकारांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. मराठी कलाविश्वातील बांदेकर कुटुंबीयांच्या घरीही लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम लवकरच बोहल्यावर चढणार आहे. सोहम अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्न करत संसार थाटणार आहे.
नुकतंच पूजाचा मेहेंदी सोहळा पार पडला. त्यानंतर आता सोहमच्या घरीही मेहेंदीचा खास कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सुचित्रा बांदेकर यांनी लेकाच्या लग्नाची हातावर मेहेंदी काढली. या मेहेंदी सोहळ्याचे फोटो सोहमने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बांदेकर कुटुंबीय एकत्र दिसत आहेत. तर सुचित्रा यांच्या हातावर मेहेंदी काढल्याचं दिसत असून लेकाच्या लग्नासाठी त्या खूपच उत्सुक असल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे. "बाकीच्यांसाठी मेहेंदी...माझ्यासाठी पार्टी. पूजा बिरारी रेडी राहा...", असं कॅप्शन सोहमने या फोटोंना दिलं आहे.
पूजा बिरारीने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत काम करताना दिसते आहे. याशिवाय 'स्वाभिमान', 'साजणा' या मालिकांमध्येही ती दिसली होती. तर सोहम बांदेकर निर्माता आहे. त्यांचं 'बांदेकर प्रोडक्शन्स' आहे. 'ठरलं तर मग'ही लोकप्रिय मालिकेची निर्मिती सोहम करत आहे.