मराठमोळ्या त्रिशा ठोसरबद्दल थेट केबीसीमध्ये विचारला गेला २५ लाखांचा प्रश्न, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:28 IST2025-10-24T13:27:07+5:302025-10-24T13:28:32+5:30
अवघ्या ६ वर्षांची आहे त्रिशा ठोसर!

मराठमोळ्या त्रिशा ठोसरबद्दल थेट केबीसीमध्ये विचारला गेला २५ लाखांचा प्रश्न, पाहा व्हिडीओ
'कौन बनेगा करोडपती' (KBC) हा केवळ एक क्विझ शो नाही, तर अनेक भारतीयांसाठी करोडपती बनण्याचे आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याचे स्वप्न आहे. या शोमुळे अनेकांचे आयुष्य बदलले आहे. मात्र, 'केबीसी'च्या हॉटसीटवर बसणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच मोठे यश म्हणजे थेट 'केबीसी'मध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारला जाणे. आता या भाग्यवान लोकांच्या यादीत मराठमोळ्या त्रिशा ठोसर (Trisha Thosar) या चिमुकल्या अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. फक्त सहा वर्षांच्या त्रिशाबद्दल थेट 'केबीसी'च्या हॉटसीटवर बसलेल्या एका स्पर्धकाला प्रश्न विचारण्यात आला आहे.
नुकतंच हॉट सीटवर बसलेल्या रचित उप्पल या स्पर्धकानं मराठमोळ्या त्रिशाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देत २५ लाख रुपयांची रक्कम जिंकली. रचित उप्पलला होस्ट अमिताभ बच्चन यांनी विचारलं की "२०२५ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण बनली?" या प्रश्नावर त्याला A - त्रिशा ठोसर, B - हर्षाली मल्होत्रा, C - सारा अर्जुन, D - झायरा वसीम असे चार पर्याय देण्यात आले. रचित उप्पलने हा प्रश्न सोडवण्यासाठी 'प्रेक्षक पोल' (Audience Poll) या लाईफलाईनचा वापर केला आणि 'A - त्रिशा ठोसर' हे योग्य उत्तर दिले.
या अचूक उत्तरानंतर रचितचा आत्मविश्वास वाढला. यानंतर त्याला ५० लाखांचा प्रश्न विचारण्यात आला की "यापैकी कोणत्या खनिजाचे सध्याचे नाव फ्रान्समधील एका गावावरून पडले आहे जिथे ते पहिल्यांदा सापडले होते?या प्रश्नासाठी त्याला A - मॅग्रेनाइट, B - एप्सोमाइट, C - बॉक्साइट, D - डॅनब्युराइट असे चार पर्याय देण्यात आले. यावर C - बॉक्साइट हा पर्याय निवडला.
यानंतर रचितने १ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत मजल मारली. १ कोटी रुपयांसाठीचा प्रश्न होता की "आतापर्यंतची सर्वात खोल पाण्याखालील बचाव मोहीम १९७३ मध्ये करण्यात आली होती, ज्यामध्ये सुमारे अर्धा किलोमीटर पाण्याखाली असलेल्या पाणबुडीत अडकलेल्या दोन माणसांना वाचवण्यात आले होते?" या प्रश्नासाठी त्याला A - कॉन्सुर, B - मीन III, C - DSV-2 अल्विन, D - नेपच्यून IV असे चार पर्याय देण्यात आले. रचितने आपली शेवटची लाईफलाईन '५०:५०' वापरली, ज्यामुळे पर्याय 'B' आणि 'D' शिल्लक राहिले. मोठा धोका पत्करून त्याने 'D - नेपच्यून IV' हा पर्याय निवडला, जो चुकीचा ठरला. या चुकीच्या उत्तरामुळे त्याला मोठी रक्कम गमवावी लागली. यावर अमिताभ बच्चन यांनीही "तुम्ही खेळ सोडला असता, तर बरे झाले असते" अशी प्रतिक्रिया दिली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर 'B - मीन III' हे होते.