'आई कुठे काय करते'मध्ये मोठा ट्विस्ट, अरुंधती-आशुतोषच्या लग्नादरम्यान या अभिनेत्रीचं कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 12:00 IST2023-02-23T11:58:40+5:302023-02-23T12:00:07+5:30
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

'आई कुठे काय करते'मध्ये मोठा ट्विस्ट, अरुंधती-आशुतोषच्या लग्नादरम्यान या अभिनेत्रीचं कमबॅक
एकीकडे मराठी टेलिव्हिजनवरील कलाकार मंडळी लग्नगाठ बांधत आहेत, तर दुसरीकडे मालिकेतही लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)मध्येही सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे. अरुंधती आणि आशुतोष लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतीच अरुंधतीची मेहंदी सेरेमनी पार पडली. दरम्यान आता मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. मालिकेत एका अभिनेत्रीने कमबॅक केले आहे. कोण असेल बरं ती... असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. तर आम्ही तुम्हाला सांगतो, ती दुसरी तिसरी कुणी नसून गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni) आहे.
मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अरुंधती लवकरच नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. नुकताच मेहंदी सोहळा पार पडला. यावेळी देशमुख कुटुंबाने अरुंधतीला सरप्राईज देत फॅमिली डान्स सादर केला. अशातच आता अरुंधती आणि संपूर्ण कुटुंबाला एक मोठं सरप्राईज मिळणार आहे. आशुतोष-अरुंधतीच्या लग्नासाठी गौरी चक्क परदेशातुन घरी परतली आहे. त्यामुळे सर्वांचा आनंद द्विगुणित होणार आहे.
बराच मोठा काळ मालिकेतून गायब असलेली गौरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे आता अरुंधती-आशुतोषच्या लग्नानंतर अभिषेक आणि गौरीचंही लग्न पाहायला मिळणार का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र मालिकेत अभिनेत्रीची ही धावती भेट असणार असल्याची हिंट प्रोमोमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे आता लग्नाच्या सीक्वेन्सनंतर गौरी कुलकर्णी मालिकेत पाहायला मिळणार की नाही, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.