२५ वर्षांचा दमदार प्रवास! बाजीरावाच्या भूमिकेपासून १०० चित्रपटांपर्यंत; सुबोध भावेने व्यक्त केली कृतज्ञता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:12 IST2025-11-01T17:10:26+5:302025-11-01T17:12:00+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave)ने नुकताच त्याच्या अभिनय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. व्यावसायिक अभिनेता म्हणून त्याच्या प्रवासाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

२५ वर्षांचा दमदार प्रवास! बाजीरावाच्या भूमिकेपासून १०० चित्रपटांपर्यंत; सुबोध भावेने व्यक्त केली कृतज्ञता
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave)ने नुकताच त्याच्या अभिनय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. व्यावसायिक अभिनेता म्हणून त्याच्या प्रवासाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, तसेच चाहत्यांचे आणि सहकलाकारांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
सुबोध भावेने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, ''२००० साली नोव्हेंबर महिन्यात स्मिता तळवलकर यांची निर्मिती आणि संजय सूरकर यांचे दिग्दर्शन असलेल्या तेव्हाच्या अल्फा टीव्ही मराठीवरील पेशवाई या मालिकेत पहिल्या बाजीराव पेशवे यांची भूमिका मला मिळाली. व्यावसायिक अभिनेता म्हणून हे माझं पहिलं काम. त्या आधी २ महिने अल्फा टीव्हीवरील गीतरामायण या मालिकेत प्रभू श्री राम यांची भूमिका केली होती पण गाण्यामध्ये संगीताच्या तुकड्यांवर प्रसंगानुरूप काही क्षणांचे चित्रीकरण असे त्याचे स्वरूप होते.''
त्याने पुढे म्हटले की, ''बाजीराव पेशवे यांची भूमिका ही खऱ्या अर्थाने पहिली व्यावसायिक भूमिका. त्यानंतर गेली २५ वर्षे वेगवेगळया व्यक्तिरेखांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसमोर येत राहिलो. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून स्वतःला तपासत राहिलो. १० ते १५ व्यावसायिक नाटक, ३५ एक मालिका, मराठी आणि हिंदी वेब मालिका, जाहिराती, आणि मराठी, हिंदी, बंगाली, मल्याळम अशा भाषेतले मिळून याच वर्षी पूर्ण झालेले १०० चित्रपट.''
''या प्रवासात विश्वास ठेऊन वेगवेगळ्या भूमिका माझ्या वाट्याला आणणारे माझे सर्व निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांना मनापासून वंदन. त्याचबरोबर मराठी वाहिन्या, माझे सर्व पडद्यावरचे व पडद्यामागचे सहकलाकार यांचे आभार. ज्यांच्यामुळे मी खूप गोष्टी शिकू शकलो आणि शिकतोय. आणि ज्यांच्यासाठी हा सगळा कलेचा सोहोळा साजरा होतोय त्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम कायम राहू द्या. २५ वर्षांचा एक छोटा टप्पा पार करतोय. अजून हजारो व्यक्तिरेखा वाट पहातायेत. पुढचा टप्पा अजून जास्तं रंजक असेल. मनःपूर्वक धन्यवाद आणि प्रेम.'', असे सुबोधने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.