'मन उधाण वाऱ्याचे' फेम अभिनेत्याचा ७०च्या दशकातील लूक होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 22:20 IST2021-06-19T22:19:58+5:302021-06-19T22:20:38+5:30
'मन उधाण वाऱ्याचे' मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.

'मन उधाण वाऱ्याचे' फेम अभिनेत्याचा ७०च्या दशकातील लूक होतोय व्हायरल
मन उधाण वाऱ्याचे मालिकेतील निखिलच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता कश्यप परूळेकर बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. लवकरच तो स्टार प्रवाह वाहिनीवर जय भवानी जय शिवाजी मालिकेत झळकणार आहे. ही मालिका २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कश्यप परूळेकर सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकताच त्याने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
कश्यप परूळेकरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, ७०च्या दशकातील लूक. त्याच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहे. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. या मालिकेत अभिनेते अजिंक्य देव,भूषण प्रधान आणि कश्यप परूळेकर दिसणार आहे.
या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे सांगतात, ‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचच नव्हे तर आपल्या देशाचं आराध्य दैवत. महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. ती वर्णावी तेवढी थोडीच आहे. आकाश ठेंगणं पडेल असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. राजा असावा तर असा. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. अश्या शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका जय भवानी जय शिवाजी सादर करताना अभिमान वाटतो आहे.
कश्यप परूळेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याने मन उधाण वाऱ्याचे मालिकेशिवाय तप्तपदी, बुगडी माझी सांडली गं या मराठी चित्रपटात आणि पानिपत या हिंदी चित्रपटात काम करताना दिसला आहे.