'कुटुंब किर्रतन'चा १००वा प्रयोग! तन्वी मुंडले झाली भावुक; म्हणाली, "हा अनुभव काही वर्षांचा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:14 IST2025-11-05T14:13:28+5:302025-11-05T14:14:05+5:30
Tanvi Mundle : अभिनेत्री तन्वी मुंडले हिने सध्या व्यावसायिक रंगभूमीवर सुरू असलेल्या आपल्या प्रवासाविषयी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

'कुटुंब किर्रतन'चा १००वा प्रयोग! तन्वी मुंडले झाली भावुक; म्हणाली, "हा अनुभव काही वर्षांचा"
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तन्वी मुंडले हिने सध्या व्यावसायिक रंगभूमीवर सुरू असलेल्या आपल्या प्रवासाविषयी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनची निर्मिती असलेल्या 'कुटुंब किर्रतन' या नाटकाचे येत्या ९ नोव्हेंबर रोजी १०० प्रयोग पूर्ण होत असल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला आहे.
तन्वी मुंडलेने तिच्या पहिल्या व्यावसायिक नाटकाच्या टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिने लिहिले आहे, "यंदा मला व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याची संधी मिळाली... माझ्या आयुष्यातील हे पहिले व्यावसायिक नाटक 'नेहमीसाठी खास' आहे." प्रशांत दामले यांच्या निर्मिती संस्थेअंतर्गत काम करण्याची संधी मिळणे, तसेच अमेय दक्षिणदास यांच्यासारखे कसलेले दिग्दर्शक, संकर्षण कऱ्हाडे (लेखक व अभिनेता), वंदना गुप्ते, अमोल कुलकर्णी आणि व्यवस्थापक समीर हंपी यांच्यासोबत काम करणे हे स्वप्न सत्यात उतरल्याचे तिने सांगितले आहे.
"या एका नाटकाने मला काही वर्षांचा अनुभव दिलाय," असे तन्वीने पोस्टमध्ये म्हटले आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रेमामुळे आणि भरलेल्या सभागृहांमुळे तिला हा अनुभव समृद्ध वाटतो. ९ नोव्हेंबरला होणाऱ्या १००व्या प्रयोगाबद्दल तिने खूप छान भावना व्यक्त केल्या आहेत आणि जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत प्रेक्षकांचे प्रेम असेच कायम राहू दे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
वर्कफ्रंट
तन्वी मुंडले ही सध्या 'कुटुंब किर्रतन' या व्यावसायिक नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाच्या आधी ती प्रामुख्याने छोट्या पडद्यावर कार्यरत होती. 'पाहिले न मी तुला' या मालिकेतील 'मानसी'च्या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत देखील मुख्य भूमिका साकारली होती. कोकणातील कुडाळची असलेली तन्वी, अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वीपासूनच थिएटरमध्ये सक्रिय होती. ललित कला केंद्रातून तिने नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.