हे चमचे फक्त माझ्या बाबांची आठवण नसून...; तेजस्विनी पंडितनं बाबांच्या आठवणीत लिहिली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 17:31 IST2021-11-28T17:29:30+5:302021-11-28T17:31:51+5:30
काय असं आहे जे तू कधीच कुणाला देणार नाहीस किंवा ते हरवलं तर तुझा एखादा भाग नाहीसा झाला असं तुला वाटेल...? याचं उत्तर तेजस्विनीने या पोस्टमध्ये दिलं आहे.

हे चमचे फक्त माझ्या बाबांची आठवण नसून...; तेजस्विनी पंडितनं बाबांच्या आठवणीत लिहिली खास पोस्ट
बाबा! आपल्या आयुष्यातला पहिला हिरो म्हणजे बाबा. आईच्या प्रेमाला तोड नाही अन् बाबाच्या प्रेमाला सर नाही. सगळ्यांच्या मनात आपल्या बाबाबद्दल एक खास जागा असते. अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिच्यासाठी तर बाबा म्हणजे सर्वस्व. तेजस्विनीचे बाबा आज या जगात नाही. पण त्यांच्या आठवणीशिवाय तिचा एकही दिवस जात नाही. तूर्तास बाबांच्या वाढदिवशी लिहिलेली तेजस्विनीची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.
काय असं आहे जे तू कधीच कुणाला देणार नाहीस किंवा ते हरवलं तर तुझा एखादा भाग नाहीसा झाला असं तुला वाटेल...? याचं उत्तर तेजस्विनीने या पोस्टमध्ये दिलं आहे.
ती लिहिते,
मला अनेकांनी विचारलं तुझं prized possession काय आहे.....?!
घड्याळ, अंगठ्या, कपडे, पर्स,soft toys की आणखी काही.....
काय असं आहे जे तू कधीच कुणाला देणार नाहीस किंवा ते हरवलं तर तुझा एखादा भाग नाहीसा झाला असं तुला वाटेल...!
तर ह्या त्या 2 गोष्टी आहेत.
माझं माझ्या बाबांवरचं प्रेम सगळ्यांनाच माहीत आहे
बाबा ने मला माणूस म्हणून घडवलं....बाबाने मला संस्कारासोबत आणखी काय दिलं तर एक चांगला Cook होण्याचा वारसा बाबा देऊन गेला, ठेऊन गेला....
हे 2 चमचे आमच्याकडे माझा जन्म झाला तेंव्हापासून आहेत. आम्ही मोठ्या होत असताना बाबा catering student आणि आमचं चहा पावडरचं दुकान होतं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आम्हा बहिणींना चहा करायला शिकवला. आमच्याकडे चहा वेगळ्या पद्धतीने बनतो. आणि तो perfect लागतो असं मला वाटतं.
त्या चहा पावडर च्या मापाचा हा एक चमचा. आणि दुसरा तो साखरेचा चमचा. त्याची दांडी तुटली आहे . पण आजतागायत तो चमचा कधी replace झाला नाही. कारण स्वयंपाकातील "प्रमाण" ह्याचं आमच्या घरी जाम महत्व....
हे चमचे फक्त माझ्या बाबाची आठवण नसून आमच्या संस्कारातल्या , शिकवणीचं प्रमाण आहे. ज्यावर माझं "प्रमाणाबाहेर" प्रेम आहे.
तोलून मापून चहा करता येईल पण बाबावरचं माझं प्रेम मोजता येणं निव्वळ अशक्य !
आज त्याच्या वाढदिवसा निमित्त लिहावसं वाटलं कारण बाबा चे खूप photos नाहियेत आमच्याकडे. कॅमेरा चं महत्व मला कळायच्या आधीच त्याने exit घेतली.
आजही तुला तितकंच miss करतो आम्ही बाबा !
जिथे कुठे असशील, देव बरे करो...