Squid Game 3: बाहुलीसोबत बाहुलाही खेळणार! 'स्क्विड गेम ३'मध्ये मोठा ट्विस्ट, रिलीजबाबत अपडेट समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:30 IST2025-01-01T12:30:00+5:302025-01-01T12:30:48+5:30
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'स्क्विड गेम ३'बाबत मोठी अपडेट मिळाली आहे. नेटफ्लिक्सने चाहत्यांना नववर्षाचं मोठं गिफ्ट दिलं आहे. येत्या नववर्षात 'स्क्विड गेम ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Squid Game 3: बाहुलीसोबत बाहुलाही खेळणार! 'स्क्विड गेम ३'मध्ये मोठा ट्विस्ट, रिलीजबाबत अपडेट समोर
'स्क्विड गेम' ही ओटीटीवरील अतिशय लोकप्रिय आणि गाजलेली वेब सीरिज आहे. नुकतंच या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या सीझनप्रमाणेच स्क्विड गेमचा दुसऱ्या सीझनही चांगलाच गाजत आहे. या सीझनलाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असून जिकडेतिकडे 'स्क्विड गेम २'ची चर्चा आहे. 'स्क्विड गेम २' नंतर आता या सीरिजच्या पुढच्या सीझनची चाहत्यांना उत्सुकता आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'स्क्विड गेम ३'बाबत मोठी अपडेट मिळाली आहे. नेटफ्लिक्सने चाहत्यांना नववर्षाचं मोठं गिफ्ट दिलं आहे. येत्या नववर्षात 'स्क्विड गेम ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'स्क्विड गेम' या कोरियन वेब सीरिजचा पहिला सीझन २०२१ साली प्रदर्शित करण्यात आला होता. या सीरिजने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. त्यानंतर या सीरिजच्या दुसऱ्या सीझनसाठी प्रेक्षकांना तब्बल ३ वर्ष वाट पाहावी लागली. २६ डिसेंबर २०२४ ला या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित करण्यात आला. पण, आता 'स्क्विड गेम ३'साठी मात्र चाहत्यांना फार वाट पाहावी लागणार नाहीये. कारण, २०२५ मध्येच या सीरिजचा पुढचा सीझन प्रदर्शित करण्यात येणार आहे.
२०२५च्या पहिल्याच दिवशी नेटफ्लिक्सने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. 'स्क्विड गेम ३'चं पहिलं पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टरवरुनच 'स्क्विड गेम ३'मध्ये मोठा ट्विस्ट असल्याचं दिसत आहे. 'स्क्विड गेम ३'च्या पोस्टरवर रेड लाइट ग्रीन लाइट या गेममधील बाहुली दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला तिच्याबरोबर एक बाहुलादेखील दिसत आहे. त्यामुळे 'स्क्विड गेम ३'बाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
'स्क्विड गेम २'मध्ये खेळाडू ४५६ पुन्हा खेळात सहभागी झाल्याचं दिसलं. खेळात भाग घेत हा खेळ संपवण्याचा तो प्रयत्न करतो. पण, यामध्ये तो अपयशी ठरतो. त्यामुळे आता पुढे काय होणार, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण, 'स्क्विड गेम ३'मध्ये मोठा ट्विस्ट दिसणार आहे. 'स्क्विड गेम ३'मध्ये या खेळाची सगळी सूत्र त्यानेच हातात घेतल्याचंही दिसू शकतं, अशी हिंट खुद्द अभिनेता ली जंग जे याने दिली आहे.