थिएटरमध्ये फ्लॉप झाला, पण ओटीटीवर घालतोय धुमाकूळ, तुम्ही पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:17 IST2025-08-08T15:16:21+5:302025-08-08T15:17:15+5:30
ओटीटीवर रिलीज होताच चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

थिएटरमध्ये फ्लॉप झाला, पण ओटीटीवर घालतोय धुमाकूळ, तुम्ही पाहिलात का?
असे अनेक सिनेमे आहेत जे थिएटरमध्ये फ्लॉप ठरले मात्र ओटीटीवर येताच हिट झाले. ओटीटीसाठी लोकांची एक वेगळीच क्रेझ असल्यामुळे लोक घरबसल्या पाहणं जास्त पसंत करत आहेत. असाच एक सिनेमा आहे, जो थिएटरमध्ये फारसं यश मिळवू न शकला नाही. पण ओटीटीवर येताच प्रेक्षकांची मने जिंकतोय. दमदार अभिनय, वेगळं कथानक आणि तगडी मांडणी असलेला हा चित्रपट आता ओटीटीवर ट्रेंड करतोय.
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होत असलेल्या या चित्रपटाचं नाव आहे 'ठग लाइफ' (Thug Life).यामध्ये कमल हासन, त्रिशा, अली फजल हे लोकप्रिय कलाकार आहेत. ५ जून २०२५ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. २०० कोटींचं बजेट असलेला हा सिनेमा थिएटरमध्ये फ्लॉप ठरला. हा सिनेमा केवळ ९७.८७ कोटींचंच कलेक्शन करू शकला. त्यानंतर ३ जुलै रोजी ‘ठग लाइफ’ नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला.
ओटीटीवर रिलीज होताच चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. IMDb वर जरी ४.२ इतकं मध्यम दर्जाचं रेटिंग मिळालं असलं तरीही तो सध्या नेटफ्लिक्सच्या टॉप १० ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत ८व्या क्रमांकावर आहे. चित्रपटाची कथा एका एन्काउंटरपासून सुरू होते, जिथे कमल हासन यांनी साकारलेला गुंड एका मुलाच्या संपर्कात येतो आणि त्यानंतर कथानक गुंतागुंतीचं होतं. मणी रत्नम यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर ए.आर.रहमान यांनी या सिनेमाला संगीत दिलंय. विशेष म्हणजे, या चित्रपटात ७० वर्षीय कमल हासन आणि त्यांच्यापेक्षा वयाने खूपच लहान असलेल्या त्रिशा यांच्यातील एक किसिंग सीनही चर्चेचा विषय ठरतो आहे.