विजय सेतुपतीच्या 'या' नव्या चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवलं, आता OTT वर येतोय, कधी आणि कुठे पाहता येईल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:08 IST2025-08-19T14:07:17+5:302025-08-19T14:08:10+5:30
बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला हा चित्रपट आता ओटीटीवर येत आहे.

विजय सेतुपतीच्या 'या' नव्या चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवलं, आता OTT वर येतोय, कधी आणि कुठे पाहता येईल?
सध्या ओटीटीवर नवीन चित्रपट येत आहेत. त्यात दाक्षिणात्य चित्रपटांनी तर प्रेक्षकांना आपल्या प्रेमातच पाडलं आहे. कथा, दिग्दर्शन आणि अभिनयाची अनोखी शैली यामुळे साऊथचे चित्रपट आता केवळ दक्षिणेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर संपूर्ण देशात त्यांचा बोलबाला आहे. असाच एक चित्रपट आता ओटीटीच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येत आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडेल.
'थलाईवन थलाईवी' (Thalaivan Thalaivii) असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात विजय सेतुपती आणि नित्या मेनन यांनी पती-पत्नीच्या नात्यातील चढ-उतार अतिशय सुंदरपणे दाखवले आहेत. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला हा चित्रपट आता ओटीटीवर येत आहे. येत्या २२ ऑगस्टपासून फक्त प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट तुम्ही हिंदीत पाहू शकता.
'थलाईवन थलाईवी' हा एक रोमँटिक-कॉमेडी फॅमिली ड्रामा असून त्याचे लेखक-दिग्दर्शक पंडिराज आहेत. चित्रपटाची कथा अगासवीरन आणि अरासी या दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींभोवती फिरते, जे अरेंज्ड मॅरेजच्या माध्यमातून एकत्र येतात. सुरुवातीला त्यांच्यात प्रेम फुलते, पण नंतर कुटुंबातील वाद आणि गैरसमजांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. अरासी गर्भवती असतानाही त्यांच्यातील वाद मिटत नाही आणि शेवटी ते घटस्फोटापर्यंत पोहोचतात. प्रेम, संघर्ष आणि नात्यांची गुंतागुंत यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करतोय.