"मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करते की..." श्रीलीलाची भावुक पोस्ट, पोलिसांत धाव घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:11 IST2025-12-18T12:09:43+5:302025-12-18T12:11:49+5:30
श्रीलीलाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

"मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करते की..." श्रीलीलाची भावुक पोस्ट, पोलिसांत धाव घेणार?
Sreeleela Calls Out Ai Misuse: चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींना एआय तंत्रज्ञानाचा वापर करून लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना, आलिया भट, काजोल, कतरिना कैफ यांच्यानंतर आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री श्रीलीला याचा बळी ठरली आहे. श्रीलीलाचे एआयद्वारे क्रिएट केलेले काही अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिने एका सडेतोड पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे.
श्रीलीलाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्ट केले की, व्हायरल होत असलेले ते फोटो तिचे नसून बनावट आहेत. तिने म्हटले, "मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करते की, एआयने निर्माण केलेल्या कोणत्याही प्रकारच्या बनावट मूर्खपणाचे समर्थन करू नका. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आणि त्याचा गैरवापर करणे यात खूप मोठा फरक आहे".
तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर भाष्य करताना श्रीलीला म्हणाली, "माझं असं मत आहे की, जर तंत्रज्ञान प्रगती करत असेल तर ते मानवी जीवन सोपे करण्यासाठी आहे, ते उद्ध्वस्त करण्यासाठी नाही. जगातील प्रत्येक मुलगी ही कोणाची तरी मुलगी, बहीण, मैत्रीण किंवा जोडीदार आहे. आम्ही अशा उद्योगाचा भाग आहोत, ज्याद्वारे लोकांमध्ये आनंद पसरला जातो. पण आम्ही ज्या वातावरणात काम करतो ते आमच्यासाठी सुरक्षित आहे, हा आत्मविश्वास आम्हाला असायला हवा".
श्रीलीलाने पुढे लिहिले की, "ऑनलाइन अनेक गोष्टी घडत असतात आणि मला त्याची जाणीव असते, पण व्यस्त वेळापत्रकामुळे मी त्या पाहू शकत नाही. हे सर्व माझ्यासाठी खूप निराशाजनक आहे. आता अधिकारी इथून पुढे त्यांचे काम सुरू करतील" असे म्हणत तिने या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडे सोपवल्याचे संकेत दिले आहेत. या कठीण काळात चाहत्यांनी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही तिने केले आहे.