प्रसिद्ध गायिकेच्या बहिणीचा ट्रेकिंग करताना मृत्यू, गेल्याच महिन्यात वडिलांचंही झालेलं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:36 IST2026-01-05T16:34:43+5:302026-01-05T16:36:10+5:30
गेल्या महिन्यात वडिलांंचं निधन, आता बहिणीनेही घेतला जगाचा निरोप; गायिकेवर कोसळला दु:खाचा डोंगर

प्रसिद्ध गायिकेच्या बहिणीचा ट्रेकिंग करताना मृत्यू, गेल्याच महिन्यात वडिलांचंही झालेलं निधन
मल्याळम गायिका चित्रा अय्यर यांची बहीण शारदा अय्यरचं निधन झालं आहे. ओमानमध्ये जेबेल शम्स पर्वतावर ट्रेकिंग करताना शारदा यांचा मृत्यू झाला. त्या ५२ वर्षांच्या होत्या. शारदा या मूळच्या केरळमधील थझावा येथील होत्या. स्वर्गीय कृषी शास्त्रज्ञ आर.डी. अय्यर आणि रोहिणी अय्यर यांच्या त्या कन्या होत्या. शारदा मस्कतमध्ये वास्तव्यास राहत होत्या.
ओमान एयरच्या माजी मॅनेजर शारदा या जेबेल शम्स येथे ट्रेकिंग ग्रुपचा भाग होत्या. २ जानेवारी रोजी ट्रेकिंग करताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा घडला हे अद्याप समोर आलेले नाही. नियमित ट्रेकिंग करणाऱ्यांच्या माहितीनुसार, जेबेल शम्स येथे ट्रेकिंग करणं अतिशय कठीण आहे. शारदा यांच्या अचानक निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांचं पार्थिव ओमानवरुन केरळमध्ये आणण्यात येणार आहे. ७ जानेवारी रोजी केरळ्या थझावा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
बहिणीच्या निधनानंतर गायिका चित्रा अय्यर यांनी भावुक पोस्ट लिहिली. "एकत्र चालत असताना तू अचानक इतक्या दूर कशी गेलीस, पण मी लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचेन. हे माझं वचन आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय काय करेन? मला सतत त्रास देणारा आवाज आता ऐकू येणार नाही. त्याशिवाय मी कशी जिवंत राहू?"
गेल्याच महिन्यात ११ डिसेंबर रोजी चित्रा आणि शारदा यांच्या वडिलांचं निधन झालं. केरळमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी शारदा अय्यरही होत्या. २४ डिसेंबर रोजी त्या ओमानला रवाना झाल्या होत्या. चित्रा अय्यर यांच्यावर महिन्याभरात पुन्ह दु:खाचा डोंगर कोसळला आहे.