समांथा रुथ प्रभूची तमीळ चित्रपटांकडे पाठ? म्हणाली - "राज आणि डीकेनं असं व्यसन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 10:54 IST2025-01-24T10:53:16+5:302025-01-24T10:54:08+5:30
Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूने आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी काही हिट होते आणि काही फ्लॉप देखील होते. तिने त्यांच्या कारकिर्दीत अनेक चांगल्या भूमिका केल्या आहेत.

समांथा रुथ प्रभूची तमीळ चित्रपटांकडे पाठ? म्हणाली - "राज आणि डीकेनं असं व्यसन..."
दमदार भूमिकेतून आपला ठसा उमटवणाऱ्या साऊथ चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक समांथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu)ने आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी काही हिट होते आणि काही फ्लॉप देखील होते. तिने त्यांच्या कारकिर्दीत अनेक चांगल्या भूमिका केल्या आहेत. मग ते तामिळ चित्रपट असोत किंवा तेलुगु चित्रपट. चाहत्यांना तिच्या भूमिका आणि अभिनय खूप आवडतो, परंतु अलिकडेच तिने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला की तिला आता अशा चित्रपटांचा भाग बनायचे नाही ज्यात तिच्याकडून काही विशेष घडण्याची अपेक्षा नाही. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत तिने तमीळ चित्रपटांपासून का दुरावली, यामागचे कारण सांगितले. तसेच राज आणि डीके यांच्यासोबत काम करतानाचा अनुभवही तिने मनमोकळेपणाने सांगितला.
जेव्हा समांथाला विचारण्यात आले की, ती आणखी तमीळ चित्रपट का साइन करत नाहीये? कारण ती शेवटची २०२२ मध्ये रिलीज झालेल्या तमीळ चित्रपट 'काथुवाकुला रेंदू कादल'मध्ये दिसली होती. तर या प्रश्नावर ती स्पष्टपणे म्हणाली की, 'अनेक चित्रपट करणे सोपे आहे, पण आता मी अशा टप्प्यात आहे की, प्रत्येक चित्रपट माझ्यासाठी शेवटचा वाटला पाहिजे. जर माझा एखाद्या प्रकल्पावर पूर्ण विश्वास नसेल तर मी तो करू शकत नाही.
राज आणि डीके यांच्यासोबत करायचंय काम
राज आणि डीकेसोबत 'रक्त ब्रह्मांड'मध्ये पुन्हा काम करण्याबद्दल सांगताना समंथा म्हणाली, "मला 'फॅमिली मॅन २' मध्ये काहीतरी नवीन करण्याची संधी मिळाली. मग 'सिटाडेल: हनी बनी'मध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आणि 'रक्त ब्रह्मांड'मध्येही काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाली. राज आणि डीके यांनी मला अशा आव्हानात्मक भूमिकांचे व्यसन लावले आहे, ज्यामुळे मला एक कलाकार म्हणून दररोज समाधान मिळते. मला तसे वाटत नसेल तर मला काम करायचे नाही.
वैयक्तिक जीवनात कठीण प्रसंगांचा करावा लागला सामना
समांथा पुढे म्हणाली की, तिला यापुढे तिच्या निर्णयांनी स्वतःला किंवा इतर कोणालाही निराश करायचे नाही. सामंथाने तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप कठीण प्रसंगांचा सामना केला आहे. २०२१ मध्ये नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर आणि २०२२ मध्ये मायोसिटिस सारख्या आजाराचे निदान झाल्यानंतर तिने स्वतःला कामापासून दूर केले. २०२३ मध्ये तिने 'शकुंतलम' आणि 'खुशी' सारख्या तेलगू चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर ती २०२४ मध्ये 'सिटाडेल: हनी बनी'मध्ये दिसली होती आणि आता ती 'रक्त ब्रह्मांड'मध्ये दिसणार आहे.