"मी आता त्याची अडचण बनलेय..." लग्नाच्या २ दिवसांनंतर समांथाची पती राजसाठी पोस्ट, म्हणाली..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:10 IST2025-12-04T13:09:32+5:302025-12-04T13:10:43+5:30
लग्नाच्या दोन दिवसांनंतर समांथाने पती राजसाठी पोस्ट लिहली आहे.

"मी आता त्याची अडचण बनलेय..." लग्नाच्या २ दिवसांनंतर समांथाची पती राजसाठी पोस्ट, म्हणाली..
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक-निर्माता राज निदिमोरु हे दोघे नुकतेच लग्नबंधनात अडकले. १ डिसेंबर २०२५ रोजी एका खासगी समारंभात विवाहबंधनात अडकून या जोडीने चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. कोईम्बतूरच्या ईशा योग सेंटरमधील लिंग भैरवी मंदिरात अगदी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता लग्नाच्या दोन दिवसांनंतर समांथाने पती राजसाठी पोस्ट लिहली आहे.
समांथाची मैत्रिण मेघना विनोद हिनं काही फोटो शेअर केले आहेत. यातील राजसोबतचा एक फोटो समांथानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. समांथानं शेअर केलेला हा फोटो अत्यंत गोड आहे. यामध्ये ती राजसमोर वरमाळा घेऊन उभी असल्याचं पहायला मिळतंय. तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट पहायला मिळतोय त्यासोबत समांथानं कॅप्शनमध्ये लिहलं, "हा तो क्षण जेव्हा मला जाणवलं की मी आता त्याची प्रॉब्लेम बनली आहे".

समांथा रुथ प्रभूने तिच्या लग्नासाठी लाल रंगाची साडी परिधान केली होती. समांथाने निवडलेली ही साडी तिच्या सौंदर्याला चार चाँद लावणारी ठरली. साध्या पण आकर्षक मेकअप आणि जुळणाऱ्या दागिन्यांमध्ये समांथा अगदी एखाद्या अप्सरेसारखी दिसली. विशेष म्हणजे समांथाचा ब्रायडल लूक जितका चर्चेत आहे, त्याहून अधिक लक्ष वेधून घेतले आहे, तिच्या वेडिंग रिंगने. समांथाला राजनं घातलेल्या अंगठीची किंमत सुमारे १.५ कोटी रुपये इतकी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
समांथा आणि राज यांचं हे दुसरं लग्न
समांथाने २०१७ मध्ये साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नाग चैतन्यशी लग्न केलं होतं. परंतु या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. तर राज निदिमोरूने सहाय्यक दिग्दर्शिका श्यामली डे हिच्याशी पहिलं लग्न केलं होतं. २०२२ मध्ये राज आणि श्यामली यांचाही घटस्फोट झाला. समंथा आणि राज यांनी 'द फॅमिली मॅन २' आणि 'सिटाडेल: हनी बनी' यांसारख्या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केलंय. आता समांथा आणि राज यांनी त्यांचे नवीन जीवन एकत्र सुरू केले आहे. चाहत्यांनी दोघांचंही अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.