राजामौलींच्या 'वाराणसी'मध्ये दिसणार रामायणाचा काळ; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार हनुमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:16 IST2025-11-20T14:15:09+5:302025-11-20T14:16:14+5:30
वाराणसी सिनेेमात बजरंगबलीच्या भूमिकेत सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची वर्णी लागली आहे. जाणून घ्या सविस्तर

राजामौलींच्या 'वाराणसी'मध्ये दिसणार रामायणाचा काळ; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार हनुमान
बाहुबली आणि RRR सारखे भव्य चित्रपट देणारे दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि सुपरस्टार महेश बाबू यांचा आगामी चित्रपट 'SSMB29' चे अधिकृत नाव आता 'वाराणसी' असे निश्चित झाले आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि 'फर्स्ट लूक' समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. विशेष म्हणजे या सिनेमात रामायणाचा काळही दिसणार आहे. याशिवाय बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सिनेमात हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
हा अभिनेता साकारणार हनुमान
'वाराणसी'च्या फर्स्ट लूकमध्ये श्रीराम आणि हनुमानाची झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटात महेश बाबू कोणती भूमिका साकारणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. आधी असा अंदाज होता की महेश बाबू हनुमानाची भूमिका साकारणार. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार, राजामौली यांनी चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी एका बॉलिवूड अभिनेत्याला कास्ट केलं आहे. तो अभिनेता दुसरा कोणी नसून तो आहे बॉलिवूड-दाक्षिणात्य अभिनेता आर. माधवन.
आर. माधवनची भूमिका
माधवनचं नाव 'वाराणसी' या चित्रपटाशी बऱ्याच दिवसांपासून जोडले जात होते, पण 'वाराणसी'च्या लाँचिंग इव्हेंटमध्ये त्याच्या नावाची घोषणा करण्यात आली नव्हती, ज्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, आताच्या रिपोर्टनुसार आर. माधवन 'हनुमानाची' भूमिका साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे. माधवनने अद्याप चित्रपटाचे शूटिंग सुरू केलेले नाही, पण लवकरच तो 'वाराणसी'च्या सेटवर काम सुरू करेल. माधवनचं शूटिंग पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. माधवनला प्रथमच पौराणिक भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
कलाकार आणि रिलीज डेट
'वाराणसी'च्या मेकर्सनी २०२६ पर्यंत चित्रपटाचे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, जेणेकरून त्यानंतर एडिटिंगसाठी पुरेसा वेळ मिळेल. हा भव्य चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात महेश बाबू, प्रियंका चोप्रा आणि पृथ्वीराज हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटींच्या आसपास आहे. या सिनेमात पौराणिक काळापासून सध्याचा आधुनिक काळ दिसणार आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देईल यात शंका नाही. त्यामुळेच 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी असल्याचं बोललं जातंय.