मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 13:58 IST2024-05-25T13:57:34+5:302024-05-25T13:58:58+5:30
आदिपुरुषमध्ये बजरंगबलीची भूमिका गाजवून देवदत्त नागेला आगामी सिनेमात थेट राजामौलींसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे (devdatta nage, ss rajamouli)

मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
एस.एस.राजामौली यांनी गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय सिनेसृष्टीचा चेहरामोहराच बदलून टाकला. 'बाहुबली', 'बाहुबली 2', 'RRR' अशा सिनेमांमधून राजामौली यांनी केवळ भारतात नव्हे तर जगभरात त्यांचा डंका गाजवला. राजामौलींसोबत काम करणं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न आहे. हीच संधी आता एका मराठमोळ्या अभिनेत्याला मिळाली आहे. हा अभिनेता म्हणजे देवदत्त नागे.
देवदत्त राजामौलींच्या सिनेमात करणार काम
देवदत्त नागेने राजामौलींसोबतचा एक फोटो शेअर केलाय. आणि खास बातमी सर्वांना सांगितलीय. 'दिग्गज दिग्दर्शकासोबत उत्साह जागवणारा क्षण, "सर श्री एस एस राजामौली गारू" यांच्या कार्यालयात.. श्री कार्तिकेय गारुचे आभार मानतो.एक प्रतिभावान तरीही अतिशय नम्र आणि साधा गोड माणूस, हा खास क्षण त्यांनी कॅमेरात टिपला..' असं कॅप्शन लिहित देवदत्तने राजामौलींसोबत आगामी सिनेमा करणार असल्याचं जाहीर केलंय. आता हा सिनेमा कोणता आहे? याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु राजामौली महेश बाबूसोबत जो आगामी करणार आहेत, त्या सिनेमात देवदत्त नागे झळकणार असल्याची शक्यता आहे.
देवदत्त नागेचं वर्कफ्रंट
देवदत्त नागेला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. 'जय मल्हार' या मालिकेत देवदत्तने साकारलेली खंडोबाची भूमिका चांगलीच गाजली. पुढे देवदत्तने काही मराठी सिनेमांमध्ये काम केलं. देवदत्तने 'आदिपुरुष' सिनेमात साकारलेली हनुमानाची भूमिका चांगलीच गाजली. आता देवदत्त पुन्हा एकदा राजामौलींच्या आगामी सिनेमानिमित्ताने साऊथ इंडस्ट्री गाजवायला सज्ज आहे.