'विरोश'च्या रिसेप्शनला बॉलिवूड सुंदरींची हजेरी, पण क्रिती-मृणालवर साउथ अभिनेत्रीच पडली भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 09:53 IST2026-03-05T09:51:59+5:302026-03-05T09:53:09+5:30
कोण आहे ही दाक्षिणात्य सुंदरी?

'विरोश'च्या रिसेप्शनला बॉलिवूड सुंदरींची हजेरी, पण क्रिती-मृणालवर साउथ अभिनेत्रीच पडली भारी!
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा विवाह सोहळा २६ फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे संपन्न झाला. तर काल ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये त्यांच्या भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नानंतर गेल्या आठवड्याभरापासून हे दोन्ही कलाकार विविध मंदिरांत जाऊन देवाचे आशीर्वाद घेत होते, त्यानंतर आता त्यांनी चित्रपटसृष्टीतील मित्रपरिवारासोबत आपला आनंद साजरा केला आहे.
या रिसेप्शन पार्टीत बॉलीवूड अभिनेत्री कृती सेननने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.'कॉकटेल २' सिनेमात दोघी एकत्र झळकणार आहेत. कृती यावेळी करण जोहरसोबत पोहोचली होती. सोशल मीडियावर या पार्टीतील काही खास फोटो समोर आले असून, यामध्ये कृती नवविवाहित जोडप्यासोबत म्हणजेच विजय आणि रश्मिकासोबत पोझ देताना दिसत आहे. एका फोटोत तिने रश्मिकाला प्रेमाने मिठी मारल्याचेही पाहायला मिळत आहे. याशिवाय अभिनेत्री रिया चक्रवर्तीनेही या सोहळ्याला हजेरी लावली होती, तिच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

विशेष म्हणजे, या रिसेप्शनमध्ये बॉलीवूड अभिनेत्रींसोबतच दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला हिच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेतलं. 'पुष्पा २' मधील आपल्या आयटम साँगमुळे बॉलीवूड चाहत्यांच्या पसंतीस उतरलेली श्रीलीला सध्या तिच्या आगामी 'आशिकी ३' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटातून ती कार्तिक आर्यनसोबत बॉलीवूडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे. या पार्टीत श्रीलीलाचा अंदाज सर्व अभिनेत्रींवर भारी पडल्याचे दिसून आले.
हैदराबादमधील या शाही सोहळ्याला दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये मेगास्टार चिरंजीवी, नागार्जुन अक्किनेनी, राम चरण, अल्लू अर्जुन, रवी तेजा, नम्रता शिरोडकर आणि राधिका सरथकुमार यांच्यासह अनेक मान्यवर कलाकारांचा समावेश होता. सध्या रश्मिका आणि विजयचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.