'टॉक्सिक'मधील कियारा अडवाणीची पहिली झलक आली समोर; यशने शेअर केलं पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 12:14 IST2025-12-21T12:11:37+5:302025-12-21T12:14:12+5:30
'टॉक्सिक'मधून कियारा अडवाणीचा फर्स्ट लूक आऊट, यशच्या आगामी सिनेमात साकारणार 'नादिया'

'टॉक्सिक'मधील कियारा अडवाणीची पहिली झलक आली समोर; यशने शेअर केलं पोस्टर
'केजीएफ' आणि 'केजीएफ २' या चित्रपटांच्या माध्यमातून तरुणाईच्या गळ्याचं ताईत बनलेल्या यश अभिनेत्याचा लवकरच 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन अप्स' हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याची वेगवेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. एखाद्या चित्रपटात एक ते दोन अभिनेत्री असतात. पण, 'टॉक्सिक'मध्ये यशसोबतकियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया झळकणार आहेत. अशातच आज 'टॉक्सिक'मधून कियारा अडवाणीचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.
'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन अप्स'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील कियारा अडवाणीचा पहिला लूक प्रदर्शित केला असून, या पोस्टरने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अभिनेता यशने स्वतः त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरून कियाराचा हा लूक शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये कियारा 'नादिया' नावाच्या पात्रात दिसत आहे.
कियाराने गडद रंगाचा 'ऑफ-शोल्डर' आणि 'हाय-स्लिट' गाऊन परिधान केला असून ती रॅम्पवर चालताना दिसत आहे. रॅम्पवर चालताना कियारा रडताना दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर अश्रूंचे ओघळ स्पष्ट दिसत आहेत. विशेष म्हणजे, तिच्या मागे एका उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण आहे, जे तिच्या दुःखाच्या अगदी विरुद्ध आहे. यावरुन कियाराचं पात्र नक्कीच काहीतरी हटके असणार असल्याचं स्पष्ट झालंय. या पोस्टरवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
'टॉक्सिक'ची पहिली खास गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या कथेची व्याप्ती फक्त पॅन इंडिया नाही तर जागतिक आहे. 'टॉक्सिक' चित्रपट हा ड्रग माफियांच्या पार्श्वभूमीवर आधारित ॲक्शन-पॅक्ड चित्रपट आहे. हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'टॉक्सिक' हा चित्रपट इंग्रजी आणि कन्नड भाषेत लिहिला आणि चित्रीत केला जातोय. तो इतर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्येही डब केला जाणार आहे.