साउथ स्टार्सवरही 'धुरंधर'ची जादू, 'स्पिरिट'च्या शूटमधून वेळ काढत प्रभासने पाहिला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 17:29 IST2026-04-09T17:29:30+5:302026-04-09T17:29:57+5:30
प्रभाससोबत दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनीही पाहिला 'धुरंधर'

साउथ स्टार्सवरही 'धुरंधर'ची जादू, 'स्पिरिट'च्या शूटमधून वेळ काढत प्रभासने पाहिला सिनेमा
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सध्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यासोबत 'स्पिरिट' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यातून वेळ काढून या दोघांनी अभिनेता रणवीर सिंहच 'धुरंधर: द रिवेंज' पाहिला. हैदराबादमधील अल्लू अर्जुनच्या 'अल्लू सिनेमाज'मध्ये या दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. सिनेमागृहाच्या आतून प्रभास आणि वांगा यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यामध्ये ते मागच्या सीटवर बसून चित्रपटाचा आनंद घेताना दिसत आहेत.
'धुरंधर' या स्पाय थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घातला आहे. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने अवघ्या २१ दिवसांत जगभरात १,६५० कोटी रुपयांहून अधिक कमाई करून अनेक मोठे रेकॉर्ड मोडले आहेत. भारतात या चित्रपटाच्या कमाईने १,०४१ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. प्रभास आणि वांगा यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्यांना हा चित्रपट प्रचंड आवडल्याचे दिसून येत आहे.
#Prabhas మరియు Sandeep Reddy Vanga నిన్న రాత్రి Allu Cinemas లో #DhurandharTheRevenge చూశారు 💥💥💥💥
— Cinema Buzz Telugu (@CinemaBuzzTelug) April 9, 2026
Darling లుక్స్ మాత్రం అదిరిపోయాయి 👌🔥 pic.twitter.com/iICFIMb67W
दुसरीकडे, प्रभास आणि संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पदुकोण बाहेर पडली असून तिच्या जागी आता तृप्ती डिमरीची वर्णी लागली आहे. कामाचे तास आणि मानधनावरून झालेल्या वादामुळे दीपिकाने हा प्रोजेक्ट सोडल्याचे सांगण्यात येत आहे. तृप्ती डिमरी या चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून प्रभाससोबतचा तिचा लूकही समोर आला आहे.
संदीप रेड्डी वांगा यांनी यापूर्वी 'अर्जुन रेड्डी', 'कबीर सिंह' आणि 'ॲनिमल' सारखे वादग्रस्त पण सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता ते प्रभाससोबत 'स्पिरिट' हा कॉप ॲक्शन ड्रामा घेऊन येत आहेत. या चित्रपटात विवेक ओबेरॉय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट ५ मार्च २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे. रणवीरचा 'धुरंधर २' पाहिल्यानंतर आता प्रभासच्या 'स्पिरिट'बद्दल चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.