"निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला...", अभिनेत्री डिंपलवर मोलकरणीचे गंभीर आरोप, दाखल केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:36 IST2025-10-01T12:36:11+5:302025-10-01T12:36:50+5:30
डिंपलवर मोलकरणीने गंभीर आरोप केले असून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. डिंपलने मारहाण करून निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मोलकरणीने केला आहे.

"निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला...", अभिनेत्री डिंपलवर मोलकरणीचे गंभीर आरोप, दाखल केली तक्रार
सिनेइंडस्ट्रीतून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. तमिळ आणि तेलुगु इंडस्ट्रीमधील अभिनेत्री डिंपल हयातीविरोधात तिच्या मोलकरणीने पोलिसांत धाव घेतली आहे. डिंपलवर मोलकरणीने गंभीर आरोप केले असून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. डिंपलने मारहाण करून निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मोलकरणीने केला आहे.
'सियासत डॉट कॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार, २२ वर्षीय प्रियंका बीबर हिने डिंपलच्या विरोधात हैदराबादमधील फिल्मनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मूळची ओडिसाची असलेली प्रियंका कामाच्या शोधात हैदराबादमध्ये आली होती. तिला डिंपल हयाती आणि तिचा पती डेव्हिड यांच्या घरी काम मिळालं. पण, काम करण्यासाठी डिंपलच्या घरी गेल्यानंतर तिचा वारंवार अपमान केला गेला. शिवीगाळ केली जायची आणि व्यवस्थित जेवणही दिलं जायचं नाही, असा आरोप प्रियंकाने केला आहे.
तुझं आयुष्य आमच्या पायातल्या चपलांच्याबरोबरही नाही, असं म्हणत डिंपलने हिणवल्याचं प्रियंकाने सांगितलं आहे. २९ सप्टेंबरला डिंपलसोबत तिचा वाद झाला. त्यानंतर डिंपल आणि तिच्या नवऱ्याने प्रियंकाला तिच्या आईवडिलांना मारण्याची धमकी दिली. जेव्हा तिने हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा डिंपलच्या नवऱ्याने तिचा फोन हिसकावून घेतला आणि तोडून टाकल्याचं मोलकरणीने म्हटलं आहे. त्यानंतर त्यांच्यात झालेल्या वादात प्रियंकाचे कपडे फाटले गेले. प्रियंकाने असा दावा केला आहे की भांडणात कपडे फाटले गेल्यानंतर तिचा विवस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न अभिनेत्रीने केला. एजेंटच्या मदतीने प्रियंका पोलिसांपर्यंत पोहोचली.
या प्रकरणी अद्याप डिंपल किंवा तिच्या पतीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. डिंपल ही साऊथ इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने २०१७ साली 'गल्फ' या तेलुगू सिनेमातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती 'अतरंगी रे', 'देवी २', 'खिलाडी', 'युरेका' या सिनेमांमध्येही झळकली.