कॅप्टन मिलर ते पुष्पा 2...रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; 2024 मध्ये दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 03:02 PM2023-12-31T15:02:42+5:302023-12-31T15:03:39+5:30

प्रेक्षकांच्या नजरा नवीन वर्षावर म्हणजेच 2024 या वर्षावर खिळल्या आहेत.

Captain Miller to Pushpa 2...Southern cinema will rule the box office in 2024 | कॅप्टन मिलर ते पुष्पा 2...रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; 2024 मध्ये दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवणार

कॅप्टन मिलर ते पुष्पा 2...रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; 2024 मध्ये दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवणार

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी एकापेक्षा एक सरस सिनेमे देत आहे. गेल्या काही वर्षांत साऊथचे डबिंग चित्रपट लोकप्रिय झाले आहेत. प्रेक्षकांच्या नजरा नवीन वर्षावर म्हणजेच 2024 या वर्षावर खिळल्या आहेत.  वर्ष 2024 मध्येही दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवणार असल्याचे दिसत आहे.  एक-दोन नाही तर  8 ते 9 बिग बजेट चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. विषयांचं वैविध्य तर सिनेमांमध्ये आहेच. पण त्याचबरोबर स्टार कलाकारांचे सिनेमे या शर्यतीत आहे. त्यामुळे वर्ष 2024 हे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. तर हे चित्रपट कोणते ते आपण जाणून घेऊया..


महेश बाबूचा 'गुंटूर कारम' चित्रपट 13 जानेवारी 2024 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्रिविक्रम यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात महेश बाबूशिवाय जगपती बाबू, प्रकाश राज आणि रम्या कृष्णन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.  तर धनुषचे चाहते 2023 पासून 'कॅप्टन मिलर' या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटात धनुष एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 12 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण माथेश्वरम करत आहेत. साथिया ज्योथी फिल्म्स बॅनर अंतर्गत हा चित्रपट बनत आहे.

अभिनेता मोहनलालचा ‘मलाइ कोकटाई वालीबन’ सिनेमा  25 जानेवरी रोजी प्रदर्शित होणार आहे.  ‘मलाइकोकटाई वालीबन’ हा चित्रपट मल्याळमसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 130 दिवस राजस्थान, चेन्नई आणि पुद्दुचेरीसह अनेक ठिकाणी झाले आहे. लिजो जोस पेल्लीसरी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

आरआरआरच्या जबरदस्त यशानंतर साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर 'देवरा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरही त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट एप्रिलपर्यंत प्रदर्शित होऊ शकतो. तर 'पोन्नियिन सेलवन 2' या चित्रपटाच्या यशानंतर आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील  प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रम हा 'थंगालान' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 26 जानेवारी 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

पुष्पा सिनेमाच्या तुफान यशानंतर आता 'पुष्पा 2' सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट 15 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रदर्शित होऊ शकतो.  'पुष्पा 2' मध्ये अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्याशिवाय सुनील, प्रकाश राज, जगपति बाबू, अनुसूया भारद्वाज अशी तगडी स्टारकास्ट आहे. दुसऱ्या पार्टमध्ये अल्लू आणि फहादमध्ये अॅक्शन पाहायला मिळणार आहे.

सुपरस्टार राम चरणचा 'गेम चेंजर' हा चित्रपटही सप्टेंबर 2024 पर्यंत प्रदर्शित होऊ शकतो. दिग्दर्शक शंकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' हिट झाल्यानंतर त्याचा प्रीक्वेल बनवला जात असून त्याला 'कांतारा चॅप्टर वन' असे नाव देण्यात आले आहे. हा सिनेमादेखील 2024 मध्ये रिलीज होऊ शकतो. तसेच 'कांगुवा' या आगामी तमिळ चित्रपटाचीही चाहते वाटत पाहत आहेत. 11 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सूर्या, बॉबी देओल, दिशा पटानी आणि योगी बाबू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
 

Web Title: Captain Miller to Pushpa 2...Southern cinema will rule the box office in 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.