निधी अग्रवालनंतर समांथाला चाहत्यांच्या गराड्यात झाली धक्काबुक्की, साडीचा पदर ओढण्याचा धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 10:03 IST2025-12-22T10:01:20+5:302025-12-22T10:03:06+5:30
Samantha Ruth Prabhu gets mobbed by fans : दाक्षिणात्य अभिनेत्री निधी अग्रवाल हिला नुकतीच गर्दीत धक्काबुकीचा सामना करावा लागला होता, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता अशीच काहीशी घटना दाक्षिणात्य सुंदरी समांथा रुथ प्रभू हिच्यासोबतही घडली आहे.

निधी अग्रवालनंतर समांथाला चाहत्यांच्या गराड्यात झाली धक्काबुक्की, साडीचा पदर ओढण्याचा धक्कादायक प्रकार
दाक्षिणात्य अभिनेत्री निधी अग्रवाल हिला नुकतीच गर्दीत धक्काबुकीचा सामना करावा लागला होता, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता अशीच काहीशी घटना दाक्षिणात्य सुंदरी समांथा रुथ प्रभू हिच्यासोबतही घडली आहे. समांथा नुकतीच हैदराबादमधील एका स्टोअर लॉन्च कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिथून परतत असताना तिला चाहत्यांच्या मोठ्या गर्दीने घेरले, ज्यामुळे तिला आपल्या गाडीपर्यंत पोहोचताना मोठी कसरत करावी लागली.
समांथा रुथ प्रभू हैदराबादमधील एका स्टोअरच्या उद्घाटनासाठी पोहोचली होती. यावेळी ती सिल्क साडीत अतिशय सुंदर दिसत होती. या कार्यक्रमातील अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, समांथाला आजूबाजूंनी गर्दीने घेरले आहे. अभिनेत्री जेव्हा कार्यक्रमातून बाहेर पडत आपल्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा गर्दी अनियंत्रित झाली होती.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, या गर्दीतून कोणीतरी समांथाच्या साडीचा पदर ओढला. यादरम्यान काही लोक खाली पडले. तरीही तिने अतिशय संयमाने स्वतःला गर्दीतून वाचवले आणि कशीबशी ती आपल्या गाडीत जाऊन बसली. आता हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते संताप व्यक्त करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, "हे चाहते इतके विचित्र का वागत आहेत?" तर दुसऱ्याने विचारले, "हे लोक प्राण्यांसारखे का वागत आहेत?" एका व्यक्तीने तर संतापून विचारले, "या लोकांची अडचण काय आहे?"
सिल्क साडीमध्ये समांथाचा ग्लॅमरस लूक
कार्यक्रमाला जाण्यापूर्वी समांथाने तिच्या या लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. काळ्या रंगाच्या सिल्क साडीत ती अत्यंत देखणी दिसत होती. तिने ही साडी स्लीव्हलेस ब्लाउजसोबत परिधान केली होती. हेवी गोल्ड ज्वेलरी आणि कपाळावर छोटी काळी टिकली लावलेल्या सामंथाच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.