'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:23 IST2025-11-18T13:22:52+5:302025-11-18T13:23:29+5:30
इंडस्ट्रीत सुरु असणाऱ्या अशा चुकीच्या मागण्या आणि गैरवर्तनावरही ती बोलली आहे

'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
प्रसिद्ध तमिळ टीव्ही अभिनेत्री मान्या आनंदने नुकतंच एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा मॅनेजर श्रेयस वर मान्याने कास्टिंग काऊचचा सरळ आरोप केला आहे. इंडस्ट्रीत सुरु असणाऱ्या अशा चुकीच्या मागण्या आणि गैरवर्तनावरही ती बोलली आहे. धनुषच्या मॅनेजरचं नाव घेतल्याने मान्याचं वक्तव्य चांगलंच व्हायरल होत आहे.
अभिनेता धनुष सध्या आगामी 'तेरे इश्क मे' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तो व्यग्र आहे. दरम्यान अभिनेत्री मान्या आनंदने केलेल्या दाव्यामुळेही धनुष चर्चेत आला आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री मान्या आनंद म्हणाली, "धनुषचा मॅनेजर श्रेयस अनेक दिवसांपासून अॅडजस्टमेंटबद्दल माझ्याशी होलत होता. तो मला सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवत होता. चुकीची मागणी करत होता. मी त्याला स्पष्ट नकार दिला. तो सतत माझ्यावर दबाव निर्माण करत होता. एका वेळी तर तो असंही म्हणाला की, 'धनुष सरांसाठीही करणार नाहीस?'. त्याने मला धनुषची प्रोडक्शन कंपनी वंडरबार फिल्म्सचं लोकेशनही पाठवलं आणि मला तिथे मीटिंगसाठी बोलवलं."
ती पुढे म्हणाली, "श्रेयसने मला एक स्क्रिप्ट पाठवली पण मी ती वाचली नाही. कारण मला तो सिनेमाच करायचा नव्हता. इंडस्ट्रीतील लोकांनी अशा प्रकारच्या घाणेरड्या मागण्या करणं आता थांबवलं पाहिजे."
मान्या आनंदच्या या आरोपांवर धनुष आणि त्याच्या मॅनेजरने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मान्याचे हे आरोप खरे आहेत की ती हे पब्लिसिटी स्टंट करत आहे अशीही धनुषच्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे.