अजान विवाद; गायक सोनू निगमच्या जीवाला धोका, धमक्यानंतर वाढविली सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 10:20 IST2018-02-06T10:19:29+5:302018-02-06T10:20:07+5:30
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या जीवाला धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे.

अजान विवाद; गायक सोनू निगमच्या जीवाला धोका, धमक्यानंतर वाढविली सुरक्षा
मुंबई- बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या जीवाला धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काही कट्टरपंथी संघटना सोनू निगमच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. गुप्तचर विभागाने पोलिसांना पाठविलेल्या अॅडव्हायजरीमध्ये सोनू निगमच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं.
सुत्रांच्या माहितीनुसार, गुप्त माहितीनुसार कट्टरपंथी संघटना सोनू निगमला कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी तसंच इव्हेन्ट प्रमोशनच्या वेळी निशाणा बनवू शकतात. या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून सोनू निगमची सुरक्षा वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
गायक सोनू निगम त्याने अजानच्याविरूद्ध केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. अजानच्या आवाजाला विरोध केल्यानंतर सोनू निगमने वाद ओढावून घेतला. त्यावेळी अनेक कट्टरपंथी संघटनांनी त्याला धमक्या दिल्या होत्या. तसंच सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजविण्याच्या सक्तीवरूनही सोनू निगने वक्तव्य केलं होतं. देशाच्या राष्ट्रगीताचा मी सन्मान करतो पण सिनेमागृहात आणि रेस्टॉरन्टमध्ये राष्ट्रगीत वाजवणं ठीक नाही, असं सोनूने म्हंटलं होतं. तसंच लोकांनी प्रत्येक देशातील राष्ट्रगीताचा सन्मान करायला हवा. आपण सगळ्यांनी आपल्या राष्ट्रगीताचा आदर करायला हवा. पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजतं तेव्हा सगळे पाकिस्तानी त्याचा सन्मान करण्यासाठी उभे राहतात. मी तरी पाकिस्तान आणि तेथिल लोकांच्या सन्मानासाठी उभा राहीन, असं सोनू निगमने म्हंटलं होतं.