"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:37 IST2025-04-19T16:36:33+5:302025-04-19T16:37:03+5:30

साधी, सोपी, तुमच्या आमच्या घरात घडणारी गोष्ट... स्त्री पुरुष संवादाचे दरवाजे नव्याने उघडणारा, हसवणारा, रडवणारा, अंतर्मुख करणारा 'सुशीला-सुजीत'.

Sonali Kulkarni work experience with Swapnil Joshi in Prasad Oak movie SUSHEELA -SUJEET | "किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत

"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत

साधी, सोपी, तुमच्या आमच्या घरात घडणारी गोष्ट... स्त्री पुरुष संवादाचे दरवाजे नव्याने उघडणारा, हसवणारा, रडवणारा, अंतर्मुख करणारा 'सुशीला-सुजीत'. याच निमित्ताने प्रसाद ओक, मंजिरी ओक, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी यांच्याशी साधलेला मनमोकळा संवाद.

'सुशीला-सुजीत' या नावाविषयी काय सांगाल, काय अर्थ दडलाय?

प्रसाद - 'सुशीला-सुजीत'मधील सु ट्रान्सपरंट होता. कारण त्यावर पाणी पडलं आहे. ती स्ट्रॅटर्जी होती. पाणी का पडलं हे चित्रपट पाहिल्यावर कळेल. प्रत्येक चित्रपट वेगळा कसा असेल याचा मी प्रयत्न करतो. बायकांना बोलायला, व्यक्त व्हायला आवडतं. बाईचं बोलणं बंद झालं तर ती घुसमटते. मनाचे दरवाजे बंद करते, जे घातक आहे. असाच पद्धतीने सुशीलाचा एक दरवाजा बंद झालाय आणि सुजीतच्या येण्याने तो उघडतो की नाही या प्रश्नांचं उत्तर सिनेमा आहे. संपूर्ण फॅमिलीने एकत्र बसून बघण्यासारखा हा सिनेमा आहे. खूप गंमत आहे. 

हे कॅरेक्टर कसं सुचलं, तुमच्या दोघांमधून ही गोष्ट समोर आली का?

प्रसाद - सुशीला-सुजीतमधील सुशीला ही बऱ्यापैकी मंजिरीमध्ये आहे. पण मी सुजीत नाही. मला सुजीत घडवायचा आहे म्हणून मी सुजीत नाही. मंजिरीसमोर मी सुजीत होतो. आम्ही २९ वर्षे एकत्र आहोत. आमच्या आयुष्यात फक्त फ्रेम्स आहेत. दरवाजा नाही. त्यामुळे तो बंद होण्याचा प्रश्नच येत नाही. 

सुजीत नेमका कसा आहे, भूमिकेविषयी काय सांगशील?

स्वप्नील - सुजीत साकारताना खूप मजा आली. असा हिरो साकारायला मिळणं हे रोजरोज घडत नाही. प्रत्येक पुरुषामध्ये सुजीत आहे. पण आपण तो दरवाजा उघडायला घाबरतो. हळवी, भावनिक बाजू समोर आणायला आपण घाबरतो. सुजीत खूप संवेदनशील आहे.

स्वप्नील-सोनालीने पहिल्यांदाच एकत्र काम केलं, कसा होता अनुभव?

सोनाली - कास्टींग ऐकल्यावर मी उडाले. मी आणि स्वप्नील एकत्र असू, अशी मी कधी कल्पनाच केली नव्हती. कारण किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या? त्याच्यासोबत नक्कीच काम करायचं होतं. आम्हाला दोघांना यापेक्षा सुंदर कथा एकत्र काम करायला मिळू शकत नाही, त्यामुळे खूप आनंदी आहे. हा सिनेमा केल्यावर खूप हुरुप आला. धीर देणारा सिनेमा आहे. 

निर्माती म्हणून काम करताना कोणती गोष्ट तुला चॅलेंजिंग वाटते? दडपण आलं का?

मंजिरी - मी निर्माती आहे, तुम्ही माझं ऐका, असा एकही क्षण नव्हता. मला ती मोठी जबाबदारी वाटते. प्रसाद, स्वप्नील आणि संजय या तिघांच्या नावाला धक्का लागू नये याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. मी खूप एन्जॉ़य केलं. मला खूप छान टीम मिळाली. कल्ला आणि मजा करत आम्ही सिनेमा केला आहे. 

चिऊताई, चिऊताई दार उघड यासाठी गश्मीर महाजनी-अमृता खानविलकर यांची निवड का करण्यात आली?

प्रसाद - अमृताने सिनेमात काम केलं आहे. ती उत्तम डान्सर आहे. गश्मीर आम्हाला भयंकर आवडतो. आम्हाला त्याच्यासोबत काम करायचं होतं. तो अप्रतिम डान्सर आहे. त्या दोघांनी एकमेकांसोबत काम केलं नाही. ते पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
 

Web Title: Sonali Kulkarni work experience with Swapnil Joshi in Prasad Oak movie SUSHEELA -SUJEET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.