"अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारुन मी स्वतःची कबर खोदली"; बॉलिवूड अभिनेत्रीला होतोय पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 11:32 IST2025-11-24T11:11:03+5:302025-11-24T11:32:22+5:30
बॉलिवूड अभिनेत्रीने एका चित्रपटात अक्षय कुमारच्या आईची भूमिका केली. पण आता हीच भूमिका केल्याचा तिला पश्चाताप होतोय

"अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारुन मी स्वतःची कबर खोदली"; बॉलिवूड अभिनेत्रीला होतोय पश्चाताप
बॉलिवूडमधील सशक्त अभिनेत्रींपैकी एक असलेली कलाकार म्हणजे शेफाली शाह. शेफाली सध्या 'दिल्ली क्राइम'च्या तिसऱ्या सीझनमधील दमदार अभिनयामुळे चर्चेत आहेत. मात्र, आपल्या यशस्वी अभिनयाच्या प्रवासादरम्यान, २००५ मध्ये आलेल्या 'वक्त: द रेस अगेंस्ट टाइम' या चित्रपटात अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारणे हा आपल्या कारकिर्दीला लागलेला मोठा ब्रेक होता, अशी कबुली तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे.
शेफाली शाहने 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'वक्त' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची आणि अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारल्याबद्दल तिला आजही पश्चात्ताप होतो. गंमत म्हणजे, त्यावेळी तिचे पती आणि चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनीही तिला ही भूमिका न करण्याचा सल्ला दिला होता. 'विपुलने मला स्पष्टपणे सांगितले होते की, ही भूमिका करू नकोस,' असं शेफालीने नमूद केलं.
या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांनी शेफालीचे नाव सुचवले होते, मात्र खुद्द विपुल शाह यांना शेफाली या भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हती. यावर प्रतिक्रिया देताना शेफाली म्हणाली, "एक दिवस मी माझ्या केसांमध्ये पावडर लावून त्यांना (विपुल) दाखवले आणि म्हणाले, 'बघा, मी मोठी आणि मॅच्युअर दिसू शकते.' ते म्हणाले, 'हे करू नकोस.' पण मी म्हणाले, 'नाही, नाही, मला हे करायचे आहे.' आणि शेवटी, अक्षयच्या आईची भूमिका साकारुन मी माझी स्वतःची कबर खोदली."
शेफालीच्या म्हणण्यानुसार, ही भूमिका साकारल्यामुळे तिला करिअरमध्ये मोठे नुकसान झाले. यानंतर तिला दीर्घकाळ चित्रपटांच्या ऑफर्स आल्या नाहीत. तिने सांगितले की, 'बरेच दिवस माझा वेळ काम करण्याऐवजी वाट पाहण्यात गेला. मात्र, या काळात ज्या काही भूमिका मिळाल्या त्यामुळे माझा फिल्मी बायोडेटा मजबूत झाला. तिने 'गांधी, माय फादर', 'द लास्ट लियर', 'वन्स अगेन' आणि 'थ्री ऑफ अस' अशा चित्रपटांचा भाग असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला, ज्यामुळे तिचे काम अधिकाधिक चांगले होत गेले आहे.
दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह यांच्या 'वक्त: द रेस अगेंस्ट टाइम' या चित्रपटात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यासोबत प्रियंका चोप्रा, राजपाल यादव आणि बोमन इराणी यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. सध्या शेफाली 'दिल्ली क्राइम ३' मध्ये डीसीपी वर्तिका चतुर्वेदीची भूमिका साकारत असून, हा शो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.