'क्रिश ४'ची चर्चा असतानाच ८ वर्षांनी हृतिक रोशनच्या 'या' गाजलेल्या सिनेमाचा येतोय सीक्वल? दिग्दर्शकाने दिली हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:09 IST2026-01-14T16:07:31+5:302026-01-14T16:09:36+5:30
'क्रिश ४' सोडा हृतिकच्या या गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल ८ वर्षांनी भेटीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हृतिकच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

'क्रिश ४'ची चर्चा असतानाच ८ वर्षांनी हृतिक रोशनच्या 'या' गाजलेल्या सिनेमाचा येतोय सीक्वल? दिग्दर्शकाने दिली हिंट
बॉलीवूडचा 'ग्रीक गॉड' हृतिक रोशनच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक असलेल्या 'क्रिश' सिनेमाचा पुढचा भाग अर्थात 'क्रिश ४'ची सध्या चांगली तयारी सुरु आहे. पण 'क्रिश ४'ची चर्चा सुरु असतानाच हृतिक रोशनच्या गाजलेल्या चित्रपटाचा एक सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सिनेमाचं नाव आहे 'काबिल'. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सिक्वलची, म्हणजेच 'काबिल २'ची (Kaabil 2) तयारी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
'काबिल २' येणार?
२०१७ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'काबिल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटात हृतिक रोशन आणि यामी गौतम यांनी अंध जोडप्याची भूमिका साकारली होती. हृतिकच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. आता तब्बल ८ वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नुकतेच दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी 'काबिल' चित्रपटाच्या यशाबद्दल आणि त्यातील पात्रांबद्दल भाष्य केले. एका युजरने जेव्हा त्यांना 'काबिल २' बद्दल विचारले, तेव्हा गुप्ता यांनी सकारात्मक प्रतिसाद देत चाहत्यांच्या उत्सुकता शिगेला पोहोचवली. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे 'काबिल २' लवकरच पडद्यावर येईल, अशी चर्चा रंगू लागली आहे.
'काबिल' चित्रपटात हृतिकने 'रोहन भटनागर' ही अंध व्यक्तिरेखा साकारली होती, जो आपल्या पत्नीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जातो. चित्रपटाचा शेवट असा झाला होता की त्यात सिक्वलसाठी वाव होता. आता 'काबिल २' मध्ये कथा पुढे कशी जाणार आणि हृतिक पुन्हा एकदा त्याच ताकदीने पडद्यावर दिसणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.