सैराटचा चार भाषांत होणार रिमेक !

By Admin | Published: August 8, 2016 02:57 AM2016-08-08T02:57:48+5:302016-08-08T02:57:48+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील इतिहासात ‘सैराट’ने जे यश मिळविले आहे ते ऐतिहासिक आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी चाहत्यांनी ‘सैराट’ला अक्षरश: डोक्यावर धरले आहे

Sarat will be remake in four languages! | सैराटचा चार भाषांत होणार रिमेक !

सैराटचा चार भाषांत होणार रिमेक !

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील इतिहासात ‘सैराट’ने जे यश मिळविले आहे ते ऐतिहासिक आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी चाहत्यांनी ‘सैराट’ला अक्षरश: डोक्यावर धरले आहे. दमदार कथानक आणि आक्रमक मार्केटिंगच्या जोरावर सैराटला यश मिळाले आहे. सैराटचे हे यश कायम राहावे आणि इतर भाषिक लोकांनाही ‘सैराट’ पाहावयास मिळावा या उद्देशाने ‘सैराट’चा चार भाषांमध्ये रिमेक होत आहे. इतर भाषांत मराठी चित्रपटाचा रिमेक होणे ही मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलीच वेळ आहे. हेदेखील एक मोठे यश मानावे लागेल. याचबरोबर सैराटच्या यशामागे अजून बऱ्याच गोष्टी आहेत. मग त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत, याबाबत सैराटचे प्रोडक्शन मॅनेजर आशिष खाचणे यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट देऊन ‘सीएनएक्स’शी साधलेला संवाद...


‘सैराट’ कोणकोणत्या भाषांत रिमेक होत आहे?
सैराट चित्रपटाचे यश पाहता तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांत रिमेक करण्याची तयारी तेथील स्थानिक दिग्दर्शकांनी दर्शविली असून, त्याबाबत पूर्ततादेखील झाली आहे. चित्रपटाचा आशय तोच असेल, मात्र कलाकार स्थानिक असतील.

मराठीत सैराट यशस्वी झाला, इतर भाषांबाबत काय सांगाल?
चित्रपटाचा आशय हा सामाजिक असून कोणत्याही क्षेत्रात आॅनर किलिंगची ही समस्या कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या रूपात डोके वर काढतेच. आणि भाषा बदलली तरी चित्रपटातील आशय बदलत नसल्याने जसा मराठी रसिकांना सैराट भोवला तसाच तेथील रसिकांनाही भावेल. म्हणून इतर भाषांमध्येही चित्रपट यशस्वी होईलच.

सैराटच्या यशाचे रहस्य काय?
चित्रपटाचा विषय तसा सर्वसाधारण मात्र नागराज मंजुळे यांनी साकारलेले दमदार कथानक, आक्रमक मार्केटिंग तसेच स्थानिक लोकेशन, स्थानिक भाषाशैली, कलाकारांची नैसर्गिक देहबोली, अजय-अतुलचे संगीत आणि सुन्न करणारा शेवट हे चित्रपटाच्या यशाचे रहस्य आहे. मात्र याहून सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाविषयी झालेली उलटसुलट चर्चा. ज्यांना चित्रपटाचा आशय समजला नाही, त्यांनीही या चर्चेमुळे निर्माण झालेल्या उत्सुकतेपोटी चित्रपट पाहिला.

सैराटसाठीचे प्रोडक्शन मॅनेजरपद कसे मिळाले?
नागराज मंजुळे आणि माझी ओळख ‘फॅन्ड्री’ चित्रपटापासून आहे. नागराजसोबत मी काही शॉर्टफिल्ममध्येही काम केले आहे. जेव्हा सैराटचे काम सुरू झाले, तेव्हा नागराजने मला त्यांचा ‘आटपाट निर्मिती’च्या टीममध्ये सामील करून घेतले आणि प्रोडक्शन मॅनेजरची जबाबदारी दिली. याच चित्रपटात माझा भाऊ ललित खाचणे याने एनिमेशन (व्हीएफएक्स प्रोड्युसर)ची जबाबदारी सांभाळली आहे.

सैराटचा अनुभव कसा वाटला?
खूपच सुंदर. प्रोडक्शन मॅनेजरचा हा माझा पहिलाच अनुभव होता म्हणून खूप मोठी जबाबदारी होती. कामात खंड न पाडता सातत्याने शूटिंग करणे, त्यामुळे खूपच मेहनत घ्यावी लागली. नागराजसोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. यामुळे आत्मविश्वासात वाढही झाली.

आर्चीबाबत काय सांगाल?
आर्चीची भूमिका चित्रपटात खूपच डॅशिंग दाखविली आहे. चित्रपटात ती जशी आहे, तशीच रियल लाइफमध्येही आहे. नागराजला चित्रपटात काम करण्यासाठी म्हणजेच कथानकाला साजेल, अशाच मुलीचा शोध होता. आणि रिंकूच्या रूपात आर्चीचे आॅडिशन झाले आणि त्यात ती खरी उतरली.

‘सैराट’च्या पार्ट २बाबत काय?
चित्रपटाचा शेवट पाहिल्यानंतर कोणालाही वाटते, की याचा पार्ट-२ येईल. आणि सोशल मीडियात याबाबत बऱ्याच गोष्टी आणि बनावट कथानक व्हायरलदेखील झाल्या. मात्र अजूनतरी याबाबत काहीही विचार नाही; आणि कदाचित तसे असते तर नागराजने नक्कीच कळविले असते.

Web Title: Sarat will be remake in four languages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.