"आपण तुझ्या लग्नात हुंडा मागू, आयुष्यभर पुरतील इतके..." असं का म्हणालेले संकर्षणचे वडील? अभिनेत्याची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 18:23 IST2025-06-02T18:22:14+5:302025-06-02T18:23:06+5:30
सोशल मीडियावर संकर्षणच्या पोस्ट अगदी इंटरेस्टिंग असतात. अशीच एक मजेशीर पोस्ट त्याने शेअर केली आहे.

"आपण तुझ्या लग्नात हुंडा मागू, आयुष्यभर पुरतील इतके..." असं का म्हणालेले संकर्षणचे वडील? अभिनेत्याची पोस्ट
मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) बहुगुणी आहे. तो उत्तम कविता करतो, उत्तम लिहितो आणि अगदी सहज सुंदर अभिनयही करतो. मूळचा परभणीचा असलेला संकर्षण आता मुंबईत स्थिरावला आहे. त्याचे एकूण एक नाटकाचे प्रयोग हे हाऊसफुल असतात. सध्या तो प्रयोगांसाठी अनेक ठिकाणी फिरतोय. सोशल मीडियावर संकर्षणच्या पोस्टही अगदी इंटरेस्टिंग असतात. अशीच एक मजेशीर पोस्ट त्याने शेअर केली आहे.
कारमध्ये बसून मुरमुरे/भडंग खातानाचा सेल्फी त्याने शेअर केला आहे. यासोबत तो लिहितो, "आपण तुझ्या लग्नांत हुंडा मागू...आयुष्यभर पूरतील इतके चुरमुरे/मुरमुरे आणि पोहयाचे पोते द्या...असं माझे बाबा गंमतीने माझ्या लग्नाच्या आधी म्हणायचे… ह्याचं कारण असं की, मुरमुरे आणि पोह्यावर असलेलं नितांत प्रेम … एखाद्या व्यसनी माणसाला तलफ येते तशी मला दुपारचे ४ वाजले कि मुरमुऱ्याची तलफ येते… नाटकाच्या प्रयोगामुळे दुपारचं जेवण उशिरा झालं आणि तरीही ४ वाजता जर कुणी मुरमुऱ्याचा चिवडा किंवा गरम पोहे आणले तर मी नक्की खाईन …"
तो पुढे लिहितो, "लहानपणी माझ्या शाळेच्या चड्डीचे दोन्ही खिसे आतून पिवळे असायचे कारण मी सायकल चालवता चालवता खिशात भरून आणलेला मुरमुऱ्याचा चिवडा खायचो… खिशाच्या अगदी तळाशी चिवड्यातली मोहरी आणि मीठ असायचं ते तर काय कमाल लागायचं … ही आवड आमच्या घरात आनुवंशिक आहे … आमचे बाबा रात्री मॅच पाहताना हमखास मुरमुरे खातात… आणि माझे साडेतीन वर्षांचे जुळेही मला 'बाबा चिवले खाउ' असं म्हणतात … आणि ताव मारतात… मुंबई पुणे प्रवास करताना ४ वाजता मुरमुरे खावेसेच वाटले…खाल्ले.. असो … तुमचा असा कोणता कौटुंबिक पदार्थ आहे का …?"